आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली. मानसीने नुकतंच सध्या सुरु असलेली लावणी, त्यात केले जाणारे अंगविक्षेप याबद्दल स्पष्ट मत मांडले.
मानसीने नुकतंच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला सध्या सुरु असलेल्या लावणी कार्यक्रम आणि डिजे शोबद्दल भाष्य केले. यावेळी तिने स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
“सध्या लावणी, डिजे शो किंवा हा जो काही प्रकार सुरु आहे, तो खूपच घाणेरडा प्रकार आहे. मी यात एका पक्षाची बाजू घेणार नाही. पण टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. मी याबद्दल फार उशीरा बोलतेय. एक नृत्य करणारी अभिनेत्री म्हणून मी याबद्दल मत व्यक्त करते. आपण नेहमी कलाकाराला दोष देतो. पण यामागे एक भावनिक बाजूही असते. त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. जर पोटापाण्याचा प्रश्न असेल तर तो कुठपर्यंत काय करतो आहे, हे देखील बघायला हवं”, असे मानसी नाईक म्हणाली.
“दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक त्यांच्याकडून या गोष्टी करुन घेतात. आता काही विभत्स आणि खूप घाणेरड्या प्रकारे काही गोष्टी सुरु झाल्या आहेत, ज्या परप्रांतीय आहेत. आपल्या महाराष्ट्रात हे नाही. आपल्या महाराष्ट्राची शान लावणी ही अशी कधीच नव्हती. पण तसे शो जे घेतात, त्यांनाही बोलायला हवं. फक्त कलाकारांना किंवा त्या मुलींनाच का बोलता? त्या करतात, कारण तुम्ही ते करण्याची परवानगी देता”, असेही तिने म्हटले.
“जर तुम्ही त्यांना फक्त लावणी सादर करा. जी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण पाहू शकतील, असे सांगा. पण दुर्देवाने आपल्या समाजात कोणालाही अभिनेता, अभिनेत्री बनवलं जातं. तर मग माझा हा प्रश्न समाजाला आहे की, तुमचे हिरो नक्की कोण आहेत? तुमचे डान्सर कोण आहेत? जेव्हा तुम्ही नेते मंडळींबद्दल ठरवता, तेव्हा तुम्ही विचार करता. मग तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती ही आहे का? याचाही विचार करा.
तुम्हाला असं वाटतं की, त्या अशा करतात, म्हणून समाज खराब होतो, तर तसं नाही. तुम्हाला तसे शो बघायचे असतात, तुम्हाला रीलवर व्ह्यू मिळतात, तुम्हाला ते बघून मज्जा येते. पण हे करु नका, कारण आपला महाराष्ट्र तसा नाही”, असेही तिने सांगितले.