आजच्या काळात सोशल मीडिया हे मत व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार, मते व्यक्त करीत असतात. मनोरंजन विश्वातही असे अनेक कलाकार आहेत; जे सोशल मीडियावर रोखठोकपणे आपले विचार मांडताना दिसतात. या कलाकारांपैकीच एक म्हणजे मनवा नाईक. मनवा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मनवाने प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सोशल मीडियावर मनवा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांवर मनवा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तही होत असते. दरम्यान, नुकतीच मनवाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने मुंबईचा होणाऱ्या ऱ्हासावर खंत व्यक्त केली आहे.
हेही वाचा- Video : स्ट्रॉबेरीची काढणी करण्यात रमली मराठमोळी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
सध्या मुंबईमध्ये सगळीकडे मोठ्याप्रमाणात खोदकाम, बांधकामे पहायला मिळत आहे. परिणाणी मुंबईच्या हवा प्रदुषण व ध्वनी प्रदुषणमध्ये वाढ होत आहे. यावरच मनवाने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. मनवाने पोस्टमध्ये लिहिले, “हे पूर्णपणे निराशाजनक आहे. वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम, रहदारी आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने मुंबई आता सर्वात वाईट शहर आहे. धुळीने माखलेल्या इमारतींचे कुरूप ब्लॉक्स वाढतच जात आहेत. नवीन पायाभूत सुविधांच्या सबबीखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जाते. “बँडस्टँड, हाजी अली ही ठिकाणे आता पूर्वीसारखी राहिली नाहीत. यानंतर आता रेस कोर्सचाही नंबर आहे. त्यामुळे हे सगळं पाहून मन दुखावलं गेलं आहे.”
मनवाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करीत अभिनेत्रीच्या मताला दुजोरा दिला आहे. एकाने कमेंट करीत लिहिले, “वास्तव वाईट आहे. विकासाच्या नावाखाली आपण केवळ इमारती बांधत आहोत आणि हा विकास आपल्याला अस्वास्थ्यमय जीवनाकडे नेत आहे.” तर दुसऱ्याने “मुंबई आता कचरा शहर बनलं आहे. झाडे, स्वच्छता व रस्त्यांची सरकार आणि नागरिकही ज्या प्रकारे अवहेलना करतात; ते अविश्वसनीय आहे.”