Marathi Actress Meera Joshi : ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री मीरा जोशी हिच्या इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहेत. मीराने चित्रपटात काम करूनही मानधन मिळालं नसल्याचं म्हटलं आहे. तिने चित्रपटाच्या निर्मात्यांनी पैसे थकवल्याची पोस्ट केली आहे. चित्रपटाचं नाव ‘जिद्दी सनम’ आहे, असं तिने सांगितलंय.
मीराने तिच्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मी नोव्हेंबर २०२३ मध्ये जिद्दी सनम नावाच्या चित्रपटासाठी शूटिंग केलं आणि तेव्हापासून पेमेंटची वाट पाहतेय. एक वर्षाहून जास्त काळ झाला आहे. प्रोडक्शन हाऊसशी बोलले, त्यांची ‘सिंटा’कडे तक्रार केली आणि काही मराठी असोसिएशन्सशी बोलले, पण कोणीच मदत केली नाही. ‘सिंटा’ने तर तक्रार नोंदवून घ्यायला पैसेही घेतले पण प्रॉब्लेम सोडवला नाही. मी पेमेंट मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले, पण एक रुपयाही मिळाला नाही. मी या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण शूट केलं होतं.”
पुढे ती म्हणाली, “मी ४, ५ आणि ६ नोव्हेंबर २०२३ ला पहिलं शेड्यूल शूट केलं. पहिल्या शेड्यूलचं शूटिंग झाल्यावर लगेच आठवडाभरात मला पैसे मिळतील, असं आश्वासन दिलं होतं. ऐन वेळेवर त्यांनी मला घेतलं होतं, त्यामुळे अॅग्रीमेंट करता आलं नाही. अॅग्रीमेंट नसल्याने पोलीस तक्रार दाखल करून घेत नाही, कारण व्हॉट्सअॅप चॅट पुरावे म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही. त्यामुळे याबद्दल मला सोशल मीडियावर बोलावं लागतंय.” मीराने चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे, तसेच मेलचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
पुढे मीराने लिहिलं, “मेलमध्ये लिहिलंय की आमची परिस्थिती समजून घ्या. मी समजून घेतली. त्यामुळेच वर्षभर वाट पाहिली. माझ्यासारखे इतरही अनेक क्रू मेंबर्स आहेत, ज्यांना पैसे मिळालेले नाहीत.” मीराने त्यांच्यावर विश्वास ठेवून चुकल्याचं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “त्यांच्यावर विश्वास ठेवणं ही माझी चूक आहे. त्यांची परिस्थिती समजून घेतली, याचा मला पश्चाताप आहे. कारण त्यांनी मला ३ नोव्हेंबरला उशीरा रात्री फोन केला होता आणि या भूमिकेबद्दल सांगितंल होतं, जेणेकरून मी दुसऱ्या दिवशी शूट करू शकेन. त्यामुळेच त्यांना अॅग्रीमेंट करता आलं नाही. पण ते म्हणाले की पहिल्या शेड्यूलनंतर अॅग्रीमेंट करू आणि मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला ही माझी सर्वात मोठी चूक झाली,” असं मीरा म्हणाली.