भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर टीका करताना सुरेश धस यांनी रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी आणि सपना चौधरी यांची नाव घेतली. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. यासंदर्भात २८ डिसेंबरला प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर २९ डिसेंबरला प्राजक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तिच्याबरोबर तिची आई, भाऊदेखील होता. या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल. तसंच युट्यूबवर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओंविरोधातही कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
या प्रकरणात प्राजक्ता माळीला पाठिंबा देण्यासाठी आता मराठी कलाकार एकटवले आहेत. सोशल मीडियाद्वारे निषेध केला जात आहे. अभिनेत्री मेघा धाडेने एका व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं की, “मन शुद्ध तुझं गोष्ट आहे, पृथ्वी मोलाची तू चालं पुढं तुला रं गड्या भीती कुणाची परवा ही कुणाची…माझा पाठिंबा #prajaktamali”
व्हिडीओमध्ये मेघा धाडे म्हणाली, “नमस्कार मी अभिनेत्री मेघा धाडे. आज तुमच्या पुढे मी माझं मत व्यक्त करायला आले आहे. ते मत व्यक्त करणं ही माझी जबाबदारी समजते. एक स्त्री म्हणून, एक महिला कलाकार म्हणून मी माझं कर्तव्य समजते की, याबद्दल मी बोललं पाहिजे. ते म्हणजे आमची एक जवळची मैत्रीण आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे, जिच्या कामाचं तुम्ही नेहमी कौतुक केलं आहे. जिचं काम, कर्तबगारी अतिशय वाखण्याजोगी आहे. गेल्या १० वर्षांत जे काही त्या मुलीने स्वतःच्या हिंमत करून दाखवलं आहे. जे तिने स्वतःचं विश्व निर्माण केलं आहे. ते कौतुक करण्यासारखं आहे. हेवा वाटण्यासारखं आहे.”
हेही वाचा – उर्मिला कोठारे कार अपघाताप्रकरणी चालकाला अटक, अभिनेत्रीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
“प्राजक्ता सगळ्यात आधी मला तुझा प्रचंड अभिमान आहे. मला तुझ्याबद्दल प्रचंड आदर आहे. कारण भल्याभल्यांना जमणार नाही, इतकं छान करिअर तू तुझं उभारून दाखवलं आहे. फक्त अभिनेत्री म्हणूनच नाही तर उत्तम निर्माती, एक उत्तम उद्योजिकता म्हणून जे काही करतेय ते सगळं खरंच कौतुकास्पद आहे. ते करण्यासाठी तू डोक्यावर घेतलेले कर्जाचे डोंगर आम्हाला माहिती आहेत. तू त्यासाठी केलेले दिवस-रात्र कष्ट आम्हाला माहिती आहेत आणि तू कष्टाने, मेहनतीने, हिंमतीने हे साध्य केलंय, या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे प्राजक्ता घाबरून जाऊ नकोस, आम्ही सगळे कलाकार तुझ्या पाठिशी आहोत आणि तुझ्या पाठिशी कायम राहू. कारण आम्ही साक्षीदार आहोत, जे तू तुझं साम्राज्य उभं केलंय, ते उभं करण्यासाठी तू घेतलेले कष्ट त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्यामुळे तुला कुठल्याही सोम्या-गोम्यांच्या फालतू टिपण्णींना घाबरून जाण्याचं किंवा त्याच्याबद्दल चिंतीत होण्याचं काहीही कारण नाहीये,” असं मेघा धाडे म्हणाली.
पुढे मेघा म्हणाली, “जे अशी टिपण्णी करतात आणि स्वतःसाठी दुसऱ्यांच्या नावाचा उपयोग करून त्या अब्रुवर शिंतोडे उडवून स्वतःचे उल्लू सिधे करून घेण्याचं जो काही त्यांचा एक केविलवाना प्रयत्न असतो. तो त्यांना खरंतर त्यांची मानसिकता दाखवतो. कारण खऱ्या आयुष्यात जे पुरुषला जमणार नाही, अशी तू कर्तबगारी दाखवली आहेस. एकहाती कुटुंबाचा आधार घेते जे तू काही केलं आहेस ते प्रत्येकाला जमण्यासारखं नाहीये. तुझा हेवा वाटण्यासारखंच तुझं काम आहे. त्यामुळे तू सोम्या-गोम्यांच्या फालतू टिपण्यांमुळे व्यथित होऊ नकोस. तुझं काम, तुझं चारित्र्य आणि तू आजवर केलेले कष्ट हे सूर्यप्रकाशासारखे लख आहे. मी त्या राजकारण्यांना सांगू इच्छिते, तुम्ही एका स्त्रीला वेठीशी धरून तिचं नाव घेऊन त्यांचं वर्णन तुम्ही करत होता, ते त्यांचं वर्णन केलं नसून तुम्ही तुमच्या मानसिकतेचं वर्णन केलं आहे. तुमच्या कुचक्या मानसिकतेचं वर्णन तुम्ही केलं आहे. तेव्हा यापुढे कुठल्याही स्त्रीबद्दल बोलताना हाही विचार करा, तुमच्याही घरात आई, बहिणी आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तुम्ही जे काही बोलतायत, जी काही कृती करताय, जी काही टीका-टिपण्णी करताय ते आम्ही सगळे बघतोय,” असं पुढे बरंच काही मेघा धाडे म्हणाली. तसंच तिने करुणा मुंडेंविषयीदेखील भाष्य केलं.
दरम्यान, याआधी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. यावरही प्राजक्ताने २८ डिसेंबरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. प्राजक्ता म्हणाली की, तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते.