अभिनेता पुष्कर जोगने मराठा जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमसीच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारण्यासंदर्भात पोस्ट केली होती. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याच्यावर कारवाईची मागणीही केली जात होती. वाद वाढत असतानाच पुष्कर जोगने पोस्ट करून वापरलेल्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्याच्या या कृतीवर बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त होत टीकाही केली होती.
आता मराठी मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्री व लावणी क्वीन मेघा घाडगेने पुष्करच्या या वागण्याचा विरोध करत त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीच्या माध्यमातून मेघा घाडगेने पुष्करला खडेबोल सुनावले आहेत. या पोस्टमध्ये मेघा लिहिते, “जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार?? बाई-माणूस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या?? तुला २ लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघून मैत्री करणारा तू. विचारांमध्येच घाण. काय करणार?”
आणखी वाचा : “…तर २ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी; म्हणाला, “बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल…”
पुढे याच पोस्टमध्ये मेघा लिहिते, “अरे मित्रा…त्यासाठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा लागतो. आजूबाजूला थोडी चौकशी करावी लागते! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे, मी तुला नक्की पाठवेन. तेसुद्धा नको असेल तर तुझ्याच जातीचे माझे काही मित्र मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसणीचे नाहीत, त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर… वा घाण…वा घाण…वा घाण…!” सध्या पुष्करच्या या पोस्टवर बरेच कलाकारही त्यांची मतं सोशल मीडियावर मांडताना दिसत आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनीही एका कॉमेंटच्या माध्यमातून त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.
पुष्करच्या पोस्टवरून वाद निर्माण झाल्यावर त्याने सोमवारी रात्री दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तो म्हणाला, “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.