अभिनेत्री मृणाल कुलकर्णी(Mrinal Kulkarni) यांनी आजवर अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी काही ऐतिहासिक भूमिकादेखील साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या जिजाऊंची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता त्या एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'(Sant Dnyaneshwaranchi Muktai) या चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या भूमिकेविषयी त्यांनी केलेले वक्तव्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मृणाल कुलकर्णी काय म्हणाल्या?

मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. यावेळी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाबाबत त्या म्हणाल्या, “माझे आजोबा गो. नी. दांडेकर यांच्या लेखणीतून उतरलेली ‘मोगरा फुलला’ ही कांदबरी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, ही चारही भावंडं आणि त्यांचं कुटुंब-आई-वडील यांच्या जीवनावर आधारित ती कादंबरी आहे. ती कांदबरी ऐकत मी लहानाची मोठी झाले. त्यातील प्रसंग चित्रित होत आहेत आणि ते पडद्यावर दिसत आहेत, हे बघणे माझ्यासाठी विलक्षण आनंद होता.”

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपटातील भूमिकेबाबत मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “पहिला हा विचार होता की मी किती भाग्यवान आहे, अनेकदा जिजाऊ आईसाहेबांची भूमिका करण्याचं भाग्य लाभलं. त्यानंतर या चित्रपटात अलौकिक अशा चार भावंडांची आई, अतिशय वेगळी भूमिका साकारली आहे, जिने खूप सहन केलं. काळासमोर ती काही करू शकत नाही, अशी तिची परिस्थिती होती. लहान चार लेकरांना सोडून तिने स्वत:चं जीवन संपवलं, हे सगळं खूपच विलक्षण आहे.”

पुढे ट्रेलरमधील काट्यांवरून चालतानाच्या सीनबाबत बोलताना मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “आम्ही आळंदीला गेलो होतो. ज्या वृक्षाला माऊलींच्या आईंनी एक लक्ष प्रदक्षिणा घातल्या, तो वृक्ष अजूनही तिथे आहे. त्याचंही आपण दर्शन घेतो आणि हे सगळं इथं घडलंय हे बघून आम्ही सगळेच खूप रोमांचित झालो. त्या काळात रूढी-परंपरा होत्या, त्या परंपरांना आव्हान देण्याचं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये होतं. संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी हीच आपली नियती आहे, म्हणून त्याचा स्वीकार केला. मात्र, त्यातून जे निर्माण झालं, या अलौकिक चार भावंडांनी उभ्या महाराष्ट्राला बदलून टाकलं. विठ्ठलाच्या चरणी त्यांनी चारही मुलांना समर्पित केलं. या वयातली चार मुलं सोडून जाणं किती भयंकर आहे. लहानपणापासून त्यांच्याबद्दल ऐकताना अंगावर काटा यायचा. पण, आता ती भूमिका साकारताना हे शक्य नाहीये असं वाटलं. त्यांच्यातही दैवत्व असलं पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाहीये.”

दरम्यान, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.