मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. सोशल मीडियावर गाणी ट्रेंड होतं आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजणांना चित्रपटातील गाण्यांनी थिरकायला भाग पाडलं आहे. अशातच ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील आशाताई म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेरावने लेकाचा व भाचीचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे प्रमुख भूमिकेत झळकल्या आहेत. याशिवाय शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, आशा ज्ञाते असे बरेच कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. चित्रपटातील ‘भातुकली गीत’ यावर नम्रता संभेरावचा लेक व भाचीने डान्स केला आहे.
नम्रता संभेरावने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात ‘नाच गं घुमा’चं तिसऱ्या आठवड्यात पदार्पण…रुद्राज आणि भाची श्रीशा दोघांचा उत्साह आनंद टिपला…मुक्ता बर्वे खास तुझ्यासाठी, का ते तुला माहित आहे.”
नम्रताने शेअर केलेल्या व्हिडीओवर कलाकारांसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकर अशा अनेक कलाकारांनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. “खूप गोड”, “भाची तुझ्यावर गेलीये”, “मी माझं हसणं कंट्रोल करू शकत नाही”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’साठी निघाल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो पाहून किरण राव म्हणाली…
दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली. दुसऱ्या दिवशी ‘नाच गं घुमा’ने ८० लाख तर तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली. त्यानंतर वीकेंड असल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायात वाढ झाली. सॅकनिक्लने दिलेल्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत चित्रपटाने १५.०५ कोटींची कमाई केली आहे.