‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमांमुळे अभिनेत्री नम्रता संभेराव घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली अनेक वर्षे विनोदाचं अचूक टायमिंग साधत तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये नम्रताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
गेल्यावर्षी १ मे २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘नाच गं घुमा’ सिनेमात नम्रताने मुक्ता बर्वेबरोबर स्क्रिन शेअर केली होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. नम्रताने यामध्ये ‘आशा’ ही भूमिका साकारली होती. सध्या सगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नम्रताने साकारलेल्या आशाच्या भूमिकेला प्रेक्षकांची पुरस्काररुपी पोचपावती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात नम्रता संभेराव यंदाची ‘सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री’ ठरली होती.
आता या पाठोपाठ नम्रताने आणखी एका पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र, या पुरस्कार सोहळ्याला नम्रताला शूटिंगच्या कारणास्तव उपस्थित राहता आलं नव्हतं. पण, अभिनेत्रीऐवजी या सोहळ्यात तिचे पती योगेश संभेराव व लेक रुद्राज हे दोघं उपस्थित होते. रुद्राजने आपल्या आईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नम्रताने आपल्या कुटुंबीयांसाठी पोस्ट शेअर लिहिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचं नम्रताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“जगातला भारी आणि गोड क्षण… ‘नाच गं घुमा’साठी मला मिळालेलं पारितोषिक घ्यायला माझं लेकरू रुद्राज आणि नवरा योगेश दोघंही मंचावर गेले. हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. शूटिंगमुळे मला त्या ठिकाणी जाता आलं नाही हे माझं दुर्दैव, पण सुदैवाने मी रुद्राजला मंचावर माझ्यासाठी अवॉर्ड घेताना पाहिलं आणि भरून पावले. आयोजकांचे मनापासून आभार त्यांनी माझं नामांकन केल्याबद्दल आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार तुम्ही मला भरघोस मतांनी जिंकवलं. असंच प्रेम राहू द्या…” असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, नम्रताने लेक रुद्राजसाठी लिहिलेली ही सुंदर पोस्ट पाहून संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून अभिनेत्री रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय येत्या काळात नम्रता आणखी नवनवीन चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.