ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नीना कुळकर्णी सध्या ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकात महत्त्वाचे पात्र साकारत आहेत. या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान नीना यांची प्रकृती बिघडली. मात्र तरीही त्यांनी नाटकाचा प्रयोग केला, अशी माहिती नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी दिली आहे.

मराठी कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक सांस्कृतिक बंध आहे. पुढील प्रयोग रद्द केल्यानंतर नीनाताईंच्या प्रकृतीची चौकशी करणारे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे अनेक मेसेजेस प्रेक्षकांनी पाठवले. प्रेक्षकांचे हे अनन्यसाधारण प्रेम बघून भरून येते, असं लेखक संदेश कुलकर्णी म्हणाले आहेत.

शिवाजी मंदिरात ८ मार्च रोजी ‘असेन मी… नसेन मी…’ या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता. महिनादिन असल्याने नाट्यगृह महिलांनी खचाखच भरले होते. नाटक बघण्यासाठी रसिक आतुर होते, पण या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची प्रकृती बिघडली होती. पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांना अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही, या विचारात सगळे होते. मात्र त्यांनी ठामपणे ‘खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोग रद्द करायचा नाही’, अशी भूमिका घेतली.

नीना कुळकर्णी यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती त्यांच्या मुलीने संदेश कुलकर्णी यांना फोन करून दिली होती. आदल्या रात्री त्यांचे जागरण झाले होते, थकव्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळे प्रयोग रद्द करायचं ठरवलं होतं, तरीही नीना कुळकर्णी आल्या. त्यांना मेकअप रूममध्ये गरगरत होतं तरीही त्यांनी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला, असं लेखक संदेश कुलकर्णी म्हणाले.

neena kulkarni
नीना कुळकर्णी (फोटो – इन्स्टाग्राम)

नाटकाचा पहिला अंक झाला, मध्यंतराचा पडदा पडल्यावर नीनाताई रंगमंचावरच कोसळल्या, उपस्थित सर्वजण घाबरले. पुढचा प्रयोग करायचा नाही असं सर्वजण म्हणत होते, पण नीना कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला. त्यांनी हिमतीने प्रयोग केला आणि हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

प्रकृती बरी नसतानाही त्यांनी ‘काहीही झाले, तरी मी प्रयोग पूर्ण करेनच’, असा निश्चय केला आणि प्रयोग पूर्ण झाला. नीना कुलकर्णी यांची प्रकृती आता बरी आहे, आणि नाटकाचे पुढचे प्रयोग सुरू झाले आहेत, अशी माहिती संदेश कुलकर्णींनी दिली.

Story img Loader