दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान, मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिता रामम्’ या तेलुगू चित्रपटाला प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडच्या बिगबजेट चित्रपटांची धोबीपछाट केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. यामधील भारतीय सैन्यातील एका जवानाची प्रेमकथा रसिक प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्यामुळे हा चित्रपट इतर भाषांमध्येही प्रदर्शित करण्यात आला. हनु राघवपुडी दिग्दर्शत ‘सिता रामम्’ चित्रपटाचे हिंदी संवाद एका मराठी अभिनेत्रीने लिहिले आहेत. अवघ्या ५ दिवसांत तिने हे काम पूर्ण केलं होतं. याबाबत नुकत्याच एका मुलाखतीमधून या अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
‘सिता रामम्’ या चित्रपटामध्ये दुलकर सलमानने लेफ्टनंट रामची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच मराठमोळ्या मृणाल ठाकूरने सीता महालक्ष्मीचे पात्र साकारले आहे. शिवाय सचिन खेडेकर, प्रकाश राज, मुरली शर्मा असे तगडे कलाकारही चित्रपटात पाहायला मिळतात. याच सुपरहिट चित्रपटाचे हिंदी संवाद मराठी अभिनेत्री, ‘बिग बॉस मराठी’ फेम नेहा शितोळे हिने लिहिले होते.
हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत; ‘तो’ कमेंट करत म्हणाला…
अभिनेत्री नेहा शितोळेने नुकतीच ‘अजब गजब पॉडकास्ट’ला मुलाखत दिली. त्यावेळे ती म्हणाली, “मधल्या काळात मी खूप लिखाणाचं काम केलं. पण सगळ्यांनाच माहितेय ते काम असं नाही. म्हणजे ‘सीता रामम्’ नावाचा एक तेलुगू चित्रपट आहे. दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर हे दोघं जण त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. तर त्या चित्रपटाचे संपूर्ण हिंदी संवाद मी लिहिलेत. कारण अत्यंत लिरिकल (lyrical) चित्रपट आहे. अत्यंत रोमँटिक, काव्यात्मक असा चित्रपट आहे आणि त्याच्यातले संवादही तसेच असले पाहिजेत. ते असे रोखठोक नुसतं तेलुगू टू हिंदी ट्रान्सलेशन केल्यासारखे संवाद होत होते. हिंदी भाषेची गंमत त्याच्यात येत नव्हती. मी म्हटलं ठीक आहे, ‘कधीपासून काम सुरू करुयात.’ तो म्हणाला, ‘आता.’ पुढच्या ५ दिवसांत आम्ही खरंच दिवसरात्र त्या स्टुडिओमध्ये राहिलो, काम केलं. ५ दिवसांत आम्ही तो चित्रपट लिहून पूर्ण केला होता.”
हेही वाचा – सोशल मीडियावर पहिली ओळख अन्…; ‘अशी’ आहे प्रथमेश परब-क्षितिजाची अनोखी लव्हस्टोरी
दरम्यान, नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये काम केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात नेहा झळकली होती.