ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ सध्या ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात निवेदिता सराफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. २४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात निवेदिता यांच्यासह अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, क्षिती जोग, राजसी भावे, राजन भिसे असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्यानिमित्ताने अलीकडेच निवेदिता सराफ यांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’विषयी भाष्य केलं. निवेदिता सराफ ‘लाडकी बहीण योजने’बाबत नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…
निवेदिता सराफ यांना विचारण्यात आलं की, ‘लाडकी बहीण योजना’ खूप चर्चा झाली. बहिणींनी सरकारच्या पदरात मापही टाकलं आहे. तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं? यात काय सुधारणा कराव्याशा वाटतात का? यावर निवेदिता सराफ म्हणाल्या, “नाही. मला असं वाटतं ही चांगलीच योजना आहे. गरजूपर्यंत आपलं सरकार पोहोचलंय. त्यासाठी त्या सगळ्या भावांचे आभार; ज्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली.”
पुढे निवेदिता सराफ म्हणाल्या, “मला असं वाटतं, नुसते पैसे देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल? सक्षम कसं होता येईल? हे जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं कुठलंही दान सतपत्री असावं. मग ते तुमच्या प्रेमाचं असेल, ज्ञानाचं असेल. त्या बरोबरीने मला असं वाटतं की, नुसते पैसे देऊन प्रश्न सुटतील असं वाटतं नाही. कारण एकदा पैसे हातात आले की ते खर्च होऊन जातात. त्यामुळे आता महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हे खूप गरजेचं आहे.”
दरम्यान, निवेदिता सराफ यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांच्या ‘संगीत मानपमान’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुबोध भावे दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारीला प्रदर्शित झाला होता. याशिवाय निवेदिता सराफ दररोज ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत निवेदिता यांनी शुभांगी ही भूमिका साकारली आहे. यात निवेदिता यांच्यासह अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत आहेत.