ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबरच निवेदिता सराफ यांनी कलाक्षेत्राला मोठं योगदान दिलं आहे. निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या वयाबद्दल खुलासा केला.
निवेदिता सराफ या सध्या ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्यांनी रत्नमाला मोहिते हे पात्र साकारले आहे. नुकतंच त्यांनी सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, याबद्दल भाष्य केले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केला.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
“मी लहान असल्यापासून मला नाटकाचं आकर्षण प्रचंड जास्त होतं. मला चित्रपटाचं तितकं आकर्षण नव्हतं. मी पहिलं नभोनाट्य केलं. मी त्यावेळी ५ ते ६ वर्षांची होते. रंगभूमी सोडलं तर पूर्वी रेडिओ आणि चित्रपट ही दोनच माध्यम होती. रेडिओ हे सर्वांसाठी जवळचं माध्यम होतं. त्यावेळी माझी आई कामगार सभा हा कार्यक्रम करायची.
त्यावेळी मी ‘वैरी’ नावाचं नभोनाट्य केलं होतं. त्यात मी मुलाचं पात्र साकारलं होतं. त्यात माझ्या वडिलांचे पात्र कमलाकर सारंग यांनी साकारले होते. मी तेव्हा ५ वर्षांचे होते. मला काही वाचता वैगरे येत नव्हतं. माझं पाठांतर आईने करुन घेतलं होतं. आता मी ६० वर्षांची आहे. त्यामुळे ५५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मला माझं वय सांगायला कोणतीही लाज वाटत नाही”, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
दरम्यान निवेदिता सराफ यांनी वयाच्या ५ व्या वर्षीपासून सिनेसृष्टीत काम केले आहे. आज त्या ६० वर्षांच्या असल्या तरी त्यांचं सौंदर्य आणि अभिनयाची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. निवेदिता सराफ यांनी ‘अखेरचा सवाल’, ‘कॉटेज नं ५४’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘वाडा चिरेबंदी’ यांसारख्या अनेक नाटकात काम केलं. सध्या त्या ‘मी स्वरा आणि ते दोघं’ या नाटकात झळकताना दिसत आहेत.