ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सध्या त्या कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकतंच निवेदिता सराफ यांनी सिनेसृष्टीत काम करणं का थांबवलं? याबद्दल खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवेदिता सराफ यांनी सौमित्र पोटे यांच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या कार्यक्रमात त्यांना तुम्ही मुलगा अनिकेतच्या जन्मानंतर तब्बल १४ वर्षांचा ब्रेक घेतला होता. सिनेसृष्टीपासून अनेक वर्ष लांब राहिल्यावर त्यांनी पुन्हा अनेक मालिका गाजवल्या. आता त्यांनी करिअरच्या शिखरावर असताना निवेदिता यांनी एवढा मोठा निर्णय का घेतला याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

“अशोकने मला तू काम सोड, असं कधीही सांगितलं नाही. तो माझा निर्णय होता. माझं बालपण जसं गेलं, ते मला अजूनही चांगलं आठवतं. मी अशी धावत घरी यायचे मग दुसऱ्या शनिवारी आईला सुट्टी असायची मग तिच्या चपला दाराबाहेर दिसल्या की मला आनंद व्हायचा. तिला काम करणं गरजेचं होतं. पण मनात ते कुठेतरी भिनलं गेलं होतं. त्यामुळे मी ठरवलं होतं की मूल झाल्यावर मला त्याला पूर्ण वेळ द्यायचा आहे.

कारण आमचं प्रोफेशन असं आहे की तुम्ही इथे सीक लिव्ह टाकू शकत नाही. माझं मूल आजारी आहे, त्याला गोवर आलाय, कांजण्या आल्यात, हे तुम्हाला सांगता येत नाही. तुम्ही हे करु शकत नाही. तुम्हाला कामाला जावंच लागतं. माझा मुलगा झाल्यावर त्याच्या सगळ्या जडणघडणीचा मला साक्षीदार व्हायचं होतं.” असे त्या म्हणाल्या.

मला त्यावेळी आईनेही सांगितलं की मी सांभाळते म्हणून पण माझं मूल आहे, ते मी वाढवलं पाहिजे असं मला वाटलं. माझ्याकडे त्यावेळी चॉइस होता. तरी अनिकेत झाल्यानंतर मी तीन कामं केली. पण मला समोर दिसत होतं. माझ्या मुलाला चाइल्ड अस्थमा होता. त्याला लहानपणापासून दम्याचा त्रास होता. त्याला धूळ आणि धूर याची अ‍ॅलर्जी आहे, हे आम्हाला खूप नंतर कळलं. त्याला अनेकदा अ‍ॅलर्जीचे अटॅक यायचे. त्यामुळे मग त्याला सोडून जाणं मला शक्य झालं नाही. त्याला माझी गरज होती, असेही निवेदिता सराफ यांनी सांगितले.

आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

दरम्यान निवेदिता सराफ यांनी वयाच्या ५ व्या वर्षीपासून सिनेसृष्टीत काम केले आहे. लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली. निवेदिता आणि अशोक यांना अनिकेत नावाचा मुलगा आहे. तो एक उत्कृष्ट शेफ आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress nivedita saraf talk about why she left acting after son aniket born and his illness nrp
Show comments