अभिनेत्री मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, मायरा वायकुळ, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक चित्रपटागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं चहूबाजूने कौतुक केलं जात आहे. अशातच अभिनेत्री पूजा सावंतने अनोख्या अंदाजात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री पूजा सावंतने ‘नाच गं घुमा’मधील शीर्षकगीतावर जबरदस्त डान्स करून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाबरोबर तिची बहीण रुचिरा सावंत देखील डान्स करताना दिसत आहे. हा जबरदस्त डान्स व्हिडीओ शेअर करत पूजाने लिहिलं आहे, “‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा…आम्ही चित्रपट लवकरच बघू , तुम्हीही न चुकता हा चित्रपट नक्की बघा…”
हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव व सुरेश रैनाची झाली ग्रेटभेट, क्रिकेटरने अभिनेत्याचं केलं कौतुक; व्हिडीओ व्हायरल
पूजा व रुचिराचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री नम्रता संभेराव म्हणाली, “माझ्या प्रिय व्यक्ती पुजू आणि रुचिरा. धन्यवाद तुमच्या गोड शुभेच्छांसाठी. लवकर चित्रपट बघा.” याशिवाय मंजिरी ओक, निखिल बने यांनी पूजा व रुचिराच्या डान्स व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमला दिली पाणीपुरी पार्टी
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पूजा सावंत मायदेशी परतली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर पूजा ऑस्ट्रेलियात गेली. पूजाचा नवरा ऑस्ट्रेलियात कामाला आहे. त्यामुळे पूजा लग्नानंतर दीड महिने ऑस्ट्रेलियात नवऱ्याबरोबर वेळ घालवत होती. ऑस्ट्रेलियातील फोटो, व्हिडीओ अभिनेत्री सातत्याने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत होती.
‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, १ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट झाली. दुसऱ्या दिवशी ‘नाच गं घुमा’ने ८० लाख तर तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली. त्यानंतर वीकेंड असल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायात वाढ झाली. सॅकनिक्लने दिलेल्या रिपोर्टनुसार, प्रदर्शनानंतर पहिल्या वीकेंडला ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने ३.९० कोटींचा गल्ला जमवला. तसंच पहिल्या सहा दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण ८.४२ कोटींची कमाई केली.