पूजा सावंत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वीच तिने साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. पूजाचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजाने होणाऱ्या नवऱ्याचा चेहराही दाखवला होता. सिद्धेश चव्हाण असे पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव आहे. आता पूजाने सोशल मीडियावर तिच्या भावी नवऱ्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.
पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर सिद्धेशबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “तुझ्या येण्याने माझी वंडरलँड आणखीनच रंगीत झाली आहे.” पूजाने ही पोस्ट सिद्धेश चव्हाणला टॅगही केली आहे. पूजाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
काही दिवसांपूर्वीच “We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठीही बघायला मिळाली होती. या फोटोवरून पूजाने गुपचूप साखरपुडा उरकला असल्याचे समोर आले होते. या पोस्टनंतर चाहत्यांबरोबर अनेक कलाकारांनी पूजावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.
पूजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत तिने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदापर्ण केलं. ‘दगडी चाळ’ चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटात तिच्याबरोबर अंकुश चौधरीची मुख्य भूमिका होती. तसेच ‘नीलकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे’, ‘आता गं बया’सारख्या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.