‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अभिनयाबरोबरच आपल्या नृत्य कौशल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. मराठी, हिंदी या दोन्ही भाषांमध्ये तिनं उत्तम काम केलं आहे. अशा या निखळ सौंदर्य व सोज्वळ पूजा सावंतला अभिनय नाही तर प्राण्यांचा डॉक्टर व्हायचं होतं, हे बऱ्याच जणांना ज्ञात आहे. आज जरी ती प्राण्यांची डॉक्टर नसली, तरी ती बऱ्याचदा जखमी किंवा कुठेही अडकलेले प्राणी किंवा पक्ष्यांना सोडवते आणि त्यांना जीवनदान देते. अशा या प्राणीप्रेमी असलेल्या पूजाचा मात्र एका खारुताईनं चार वर्ष बदला घेतला होता. याचा किस्सा तिनं नुकताच सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘त्या’ फोटोमुळे भार्गवी चिरमुले झाली होती ट्रोल, नेटकरी म्हणाले होते “मरा सिगारेट पिऊन”

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’ कार्यक्रमात पूजा सावंत व बहीण रुचिरा सावंत सहभागी झाली होती. यावेळेस दोघी बहिणींनी रिओ नावाच्या खारुताईचा (मेल) एक किस्सा सांगितला. रुचिरा म्हणाली की, “आमच्या घरी एक फिमेल खारुताई आणली होती. तिला चालता येत नव्हतं म्हणून तिला घरी आणलं होतं. तिच्यावर उपचार केल्यानंतर ती मस्त झाली होती. त्यानंतर तिला सोडायचं होतं. म्हणून मी तिला ती आठवड्यांपासून आमच्यापासून दूर ठेवतं होते आणि तिला तसं ट्रेनही करत होते. एकेदिवशी मी कॉलेजला निघून गेले आणि घरी काय घडलं हे पुढे ही (पूजा सावंत) सांगेल.”

पुढे पूजा म्हणाली की, “त्या खारुताईला आम्हाला आठवड्याभरानंतर सोडायचं होतं. एकेदिवशी ती खारुताई खूप घाबरली आणि आवाज काढतं होती. खारुताई घाबरल्यानंतर कुठेतरी अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे ती कुठेही अडकू नये हाच माझा हेतू होता. पण त्यादिवशी ती घाबरल्यामुळे पलंगाच्या खाली गेली. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी मीही पलंगाच्या खाली गेले. मी तिला अलगदपणे हातात पकडलं. तेव्हा तिनं पुन्हा तो आवाज काढला. हे ऐकून आमचा रिओ आला. त्याला वाटलं, त्या खारुताईवर कोणीतरी हल्ला केला. त्याकाळात या दोघांचा खूप चांगलं जमलं होतं. कदाचित रिओची ती गर्लफ्रेंडही झाली असावी. त्यावेळेस तिचा आवाज ऐकून रिओ आला आणि तो माझ्या थेट हातावर जोरात चावला. हातातून रक्त वाहून लागला. मी ओरडले, तितक्यात ती मला हाताच्या आतल्या बाजूला चावली. पुन्हा तिथून रक्त वाहू लागलं. रुचीला मी लगेच फोटो वगैरे पाठवले.”

हेही वाचा – पूजा सावंतच्या कुटुंबीयांना बिल्डिंगमधून हाकलून देण्याची मिळालेली ताकीद, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्रीनेच केला खुलासा

“पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी हिनं (रुचिरा) त्या फिमेल खारुताईला सोडलं. त्यानंतर ती रिओला दिसेना. त्यामुळे त्याला असं वाटलं की, मी तिला काहीतरी केलं आणि त्यामुळे ती आता दिसत नाहीये. त्या दिवसापासून रिओनं चार वर्ष माझ्यावर डूग धरला होता. या चार वर्षात रिओला जवळ करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण तो थेट मला चावायचा. त्या चार वर्षात मी रुचिच्या (रुचिरा) बेडरूममध्ये सुद्धा गेले नाही. मला तिच्या बेडरूममध्ये जाण्यासाठी सक्त मनाई होती. रुचिचे वाळलेले कपडेही तिच्या बेडरूम बाहेर ठेवलेले जायचे. जेव्हा रुचि येईल तेव्हा ती बेडरूममध्ये घेऊन जायची. रुचिच्या बेडरूममध्ये सगळ्या पक्ष्यांना परवानगी होती, माझ्या मांजरींना परवानगी होती आणि सगळ्यांबरोबर रिओ खेळायचा. पण मी दिसली की जिथे असेल तिकडून तो धावत यायचा आणि कसा पोहोचून हिला चावणार हे तो पाहायचा. तो खूप वेळा चावला. एकेदिवशी मी आरशात बघत होते. मला माहितच नव्हतं हा माझ्यावर आहे. त्यानं माझ्या खांद्यावर थेट उडी मारली आणि पुन्हा जोरात चावला. माझ्या कपड्यांचा वास तो ओळखायचा. माझा एखादा कपडा रुचिच्या बेडरूममध्ये गेला तर दुसऱ्या दिवशी त्याच्या चिंद्या मिळायच्या. ज्या कपड्यांना माझा वास असायचा, ते कपडे तो फाडून टाकायचा. आपल्याकडे नागीण सगळं लक्षात ठेवते, अशी अफवा आहे. पण खारुताई खरंतर तशा असतात. खारुताईला खायला, सगळं काही तिच्याकडे करा, पण प्लिज दगड वगैरे मारू नका, नाहीतर तुमचं आयुष्य बर्बाद होईल,” असं पूजा सावंत म्हणाली.

हेही वाचा – अभिनेत्री पूजा सावंतची बहीण कोण आहे? काय काम करते? जाणून घ्या

हेही वाचा – दत्तू मोरेनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘हा’ कलाकार चढणार बोहल्यावर? समीर चौघुले म्हणाले, “लग्न नाही, तर स्वयंवर…”

दरम्यान, पूजा सावंतच्या या रिओ नावाच्या खारुताईचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. चार वर्ष खारुताईंचं आयुष्य असतं पण रिओ हा सहा वर्ष जगला. त्याच्या खास व्हिडीओ पूजानं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress pooja sawant shares rio squirrel memories pps