‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले कलाकार आता नवनवीन नाटकात, चित्रपटात पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी हास्यजत्रामधील काही कलाकारांचं एक नवंकोर नाटक रंगभूमीवर आलं; ज्याला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हेच नाटक नुकतंच प्राजक्ता माळीने पाहिलं आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक केलं.

गेल्या वर्षी २१ डिसेंबरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर आणि भक्ती देसाईचं नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. ‘थेट तुमच्या घरातून’ असं या नव्या नाटकाचं नाव आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे नाटक खूप चर्चेत आहे. तसंच या नाटकातील कलाकारांच्या कामाचं खूप कौतुक केलं जातं आहे.

नुकतंच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्राजक्ता माळीसह निखिल बने, प्रियदर्शिनी इंदलकर, चेतना भट्ट या कलाकारांनी ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक पाहिलं. याचा फोटो प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. तसंच या फोटोवर प्राजक्ताने लिहिलं आहे की, ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक थेट तुमच्या काळजाला हात घालतं. प्रत्येक कुटुंबानं आवर्जुन पाहावं असं नाटक आहे. सगळेच कलाकार भारी काम करतायेत…ओंकारचं गाणं आणि दुसऱ्या अंकामधील नम्रताचं काम हे केकवरील दोन चेरीसारखं होतं. लवकरात लवकर आपापल्या शहरात हे नाटक पाहा.

प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम स्टोरी
प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवाली परबने मराठी नाट्यसृष्टीत पाऊल ठेवलं. या नाटकात तिने श्रुती कदमची भूमिका साकारली आहे. तसंच प्रसाद खांडेकर – दिपक कदम उर्फ गोट्या काका, नम्रता संभेराव – संध्या कदम, ओंकार राऊत – राहुल कदम, प्रथमेश शिवलकर – गॉडफादर, भक्ती देसाई – सारा लेले या भूमिकेत झळकले आहेत. लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हास्यजत्रेच्या कलाकारांबरोबर स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे पाहायला मिळणार आहे. ‘चिकी चिकी बुबूम बूम’, असं चित्रपटाचं नाव असून २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader