अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एकापेक्षा एक चित्रपट व तिने साकारलेल्या भूमिका यामुळे आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर असलेली पाहायला मिळत आहे. २०१२ मध्ये अभिनेत्रीने स्टुंडट ऑफ द इअर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘राझी’, ‘गली बॉय’, ‘कलंक’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्स’ या चित्रपटातून तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. व्यावसायिक आयुष्याबरोबरच अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. रणबीर कपूरबरोबर आलिया भट्टने लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या जोडीला चाहत्यांचे प्रेम मिळताना दिसते. त्यांची लेक राहा सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. राहामुळेदेखील हे सेलेब्रिटी जोडपे मोठे चर्चेत असते. आता अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आलिया भट्टचे एका मुलाखतीत कौतुक केले आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत एक अशी अभिनेत्री जिची स्टाइल तुला खूप आवडते आणि जिच्या वॉड्रोबवर तुझी नजर असते. यावर उत्तर देताना अभिनेत्रीने आलिया भट्ट असे म्हटले. पुढे प्राजक्ताने म्हटले, “ती वेगवेगळे जे काही ट्राय करत असते, ते मला आवडतं. तिने कशालाच हद्दपार केलेलं नाही. ती सगळ्याच गोष्टी करत असते. मला त्या मुलीचं कौतुक वाटतं. मुलगी, नवरा, संसार इतकं सगळं असून ती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. हे छान आहे, हे जमलं पाहिजे”, असे म्हणत अभिनेत्रीने आलिया भट्टचे कौतुक केले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून अभिनेत्री घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने चित्रपटांत काम केले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची यशस्वीपणे धुरा सांभाळताना दिसते. नुकतीच अभिनेत्रीने निर्माती म्हणूनही काम केले. फुलवंती या चित्रपटाची निर्माती म्हणून तिने काम केले. तसेच या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत देखील दिसली. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत होता.
आता प्राजक्ता माळी प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता स्वप्नील जोशी, वनिता खरात, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रार्थना बेहेरे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.