Maha Khumbh Mela 2025: सध्या सर्वत्र महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरू आहे. यावर्षी महाकुंभ मेळ्याचं आयोजन उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे करण्यात आलं आहे. १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. आतापर्यंत कोट्यावधी भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट देत पवित्र स्नान केलं आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गज मंडळींनी महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला. तसंच सिनेविश्वातील कलाकारदेखील महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळाले. आता या यादीत प्राजक्ता माळीचं नाव सामील झालं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची आघाडीची नायिका म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ताने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहेत, तितकाच तिच्या सौंदर्याचा देखील चाहता वर्ग आहे. प्राजक्ता माळी अभिनयाबरोबर उत्तम कवयित्री, नृत्यांगना, निवेदक व्यावसायिका आणि निर्माती आहे. अशा या हरहुन्नरी प्राजक्ता माळीने नुकतीच महाकुंभ मेळ्याला भेट दिली. याचा व्हिडीओ शेअर करत तिने महाकुंभ मेळ्याचा अनुभव शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये महाकुंभ मेळ्यात फिरताना प्राजक्ता माळी दिसत आहे. तसंच ती पवित्र स्नान करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे, “तीर्थराज – प्रयागराज #महाकुंभ #२०२५ लहानपणापासूनच कुंभ मेळ्याविषयी मनात कुतूहल होतं.
१४४ वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पाहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोहोचले.(काल सुखरूप महाराष्ट्रातही पोहोचले.) आयुष्यात एकदाच येणार अद्भुत अनुभव आहे.”
दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘फुलवंती’नंतर आता लवकरच तिचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्य भेटीस येणार आहे. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ असं प्राजक्ता नव्या चित्रपटाचं नाव असून २८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्राजक्तासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, रोहित माने असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं.