मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात प्राजक्ता अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात यांच्यासह झळकणार आहे. प्रसाद खांडेकरने ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून २८ फेब्रुवारीला हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने प्राजक्ता माळी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. अशातच प्राजक्ताला एका शेतकरी मुलाने लग्नाची मागणी घातल्याचं समोर आलं आहे.

‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलवरील ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमात प्राजक्ता माळी सहभागी झाली होती. यावेळी तिने लग्नाला तयार असल्याचं सांगत आईला मुलं बघण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं. एवढंच नव्हे तर तिला दोन मुलांनी पत्राच्या माध्यमातून लग्नाची मागणी घातली आली आहे. त्यातील तिला एका शेतकरी मुलाचं पत्र आवडल्याचं स्पष्ट केलं.

प्राजक्ता माळी म्हणाली, “माझ्यासाठी मुलं शोधण्याकरिता अखेर मी आईला आता परवानगी दिली आहे. ही ब्रेकिंग न्यूज आहे. काही दिवसांपूर्वी मी उडतं उडतं असंच कुठेतरी बोलले होते, तर आईला खरंच दोन पत्र आली आहेत. मला ती पत्र इतकं आवडली आहेत. मला असं वाटतंय त्यांना फोन लावावा. कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेलं आहे की, मी शेतकरी आहे. मला माहिती आहे हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय. तुमचं क्षेत्र वेगळं आहे. पण मला हे प्रांजळपणे मांडायचं आहे, मी शेतकरी आहे. मी शेतीचं करणार, तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.”

“मला हे पत्र इतकं आवडलं की म्हटलं, हे किती गोड आहे. त्यामुळे मी आता मुलं बघण्यासाठी मना केली नाहीये. आधी मी म्हणायचे, तुम्ही डोकेदुखी नका करू. माझ्या डोक्याला ताप देऊ नका. पण, मी आता प्रवाहप्रमाणे जातेय. तुला वाटतंय असं करायचं, आणच शोधून. मी बघतेच…तयार होईल. पण जेव्हा होईल तेव्हा होईल. होईल तरी उत्तम आणि नाही होईल तरी उत्तम”, असं प्राजक्ता माळी म्हणाली.

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाला नुकतंच ‘झी चित्र गौरव २०२५’ सोहळ्यात गौरविण्यात आलं. एक-दोन नव्हे तर ‘फुलवंती’ चित्रपटाला तब्बल सहा पुरस्कार मिळाले. द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इअर – प्राजक्ता माळी, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – महेश लिमये, सर्वोत्कृष्ट गायिका – वैशाली माढे, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – उमेश जाधव, सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा – महेश बराटे हे सहा पुरस्कार ‘फुलवंती’ चित्रपटाला मिळाले.

Story img Loader