‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘टाइम प्लीज’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’ अशा अनेक मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). मराठी सिनेसृष्टीबरोबरच प्रिया बॉलीवूड विश्वातही चांगलीच लोकप्रिय आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रियाने (Priya Bapat) मालिका, चित्रपट, नाटक व वेब सीरिज अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याशिवाय प्रियाने निर्माती म्हणूनही काम करण्यास सुरुवात केली आहे. अभिनय व निर्मिती या क्षेत्रांत सक्रिय असण्याबरोबरच प्रिया सोशल मीडियावरही चर्चेत असते.

प्रिया बापटने शेअर केला आईबरोबरचा जुना फोटो

सोशल मीडियावर प्रिया (Priya Bapat) आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. त्याशिवाय सोशल मीडियाद्वारे ती आपल्या कामाबद्दलची माहितीदेखील शेअर करीत असते. अशातच अभिनेत्रीने आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. आज प्रियाच्या आईचा वाढदिवस असून, आपल्या आईच्या आठवणीत एक जुना फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोसह तिने एक भावूक पोस्टदेखील लिहिली आहे.

प्रिया बापट आईच्या आठवणीत भावुक

आईबरोबरचा फोटो शेअर करीत प्रियाने (Priya Bapat) “वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई. मला तुझी खूप आठवण येते. मला माहीत आहे की, तू माझ्यावर कायम लक्ष ठेवत आहेस”, असे म्हटले आहे. प्रियाने काही वर्षांपूर्वीच आपल्या आईला गमावले. ती अनेकदा आपल्या अनेक पोस्ट किंवा मुलाखतींमधून आईबद्दलच्या आठवणी व्यक्त करताना दिसते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रियाने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्स करीत प्रतिसाद दिला आहे.

अभिनेता अभिजीत केळकर, अभिनेत्री शर्वरी लोहकरे या कलाकारांसह अनेक चाहत्यांनी प्रियाच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, प्रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती नुकतीच ‘विस्फोट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्याशिवाय रंगभूमीवर तिचे (Priya Bapat) व उमेशचे (Umesh Kamat) ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सुरू आहे. प्रेक्षकांकडून या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.