अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत त्या सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठेंच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यामुळे सध्या प्रिया बेर्डे चर्चेत आल्या आहेत. अशात त्यांनी मुलांना इंडस्ट्रीत आलेल्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे.
हेही वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे झळकणार ‘या’ भूमिकेत; पहिला लूक आला समोर
सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्युब चॅनलेवर नुकतीच प्रिया बेर्डे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारलं गेलं, ‘तुमची दोन्ही मुलं इंडस्ट्रीत आहेत. दोन्ही मुलं चांगलं काम करतायत, सोबर आहेत. त्यांना तुम्ही काय मंत्र दिलाय? काय गोष्ट ठेवली पाहिजे? काय टिकवलं पाहिजे? काय जाणीव घेऊन काम केलं पाहिजे? असं काही सांगितलंय?’ त्यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “मी त्यांना एवढंच सांगितलं की, जे तुमच्यामागे नाव लागलंय ना त्याचं महत्त्व लक्षात ठेवा. तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आणि मुलगी आहे म्हणून दोन-तीन चित्रपट मिळतील; पण पुढे काय? त्यासाठी तुम्हाला कष्ट घेणं, मेहनत करणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीत स्टार किड्स वगैरे असं काही नसतं, असं मला वाटतं.”
हेही वाचा – क्षिती जोगचं फेसबुक पेज हॅक; अकाउंटवरून अश्लील व्हिडीओ झाले शेअर, अभिनेत्री म्हणाली…
पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या, “इंडस्ट्रीत आल्यानंतर अभिनय, स्वानंदीला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. ट्रेमध्ये सजवून वगैरे त्यांना काही मिळालं नाहीये. तिथे त्यांना मेहनत करायची आहे. त्यात लक्ष्याचा मुलगा त्याला चित्रपट मिळणारच, असे लोकांचे टोमणेही त्याला ऐकावे लागत आहेत. इंडस्ट्रीत त्यांना मोठमोठ्या लोकांकडून खूप वाईट अनुभवसुद्धा आले; पण मी नावं सांगू शकत नाही. खूप वाईट वागणूक दिली गेलेली आहे. विशेष म्हणजे अभिनयला तशी वागणूक मिळाली आहे. पण, ते शेवटी अनुभव असतात. म्हणून मी त्यांना म्हटलंय, तुम्ही अनुभवाने मोठे होणार आहात. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हे अनुभव तुम्हाला नाही मिळणार.”
त्यानंतर सौमित्र पोटे यांनी विचारलं, ‘ज्या लक्ष्मीकांतवर आपण इतकं प्रेम करतो, त्याच्या मुलाला आपल्या इंडस्ट्रीत असे अनुभव येऊ शकतात?’ त्यावर प्रिया म्हणाल्या, “हो! येऊ शकतात ना. का नाही येणार? कारण- त्यांचा बाप जिवंत नाहीये ना. ते असते, तर गोष्ट वेगळी असती. म्हणून म्हटलं की, हे स्ट्रगल फार विचित्र आणि वेगळं आहे. हे असं होतच नाही, असं तुम्ही काहीही समजू नका. लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी प्रेम हे लोकांच्या मनात असतं किंवा त्यांना असं वाटतं असतं की, लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आणि मुलगी आहे. पण, असं नाहीये; इथे आम्हाला खूप स्ट्रगल आहे. इथे माझ्या मुलांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं आहे. परकोटीचे मान-अपमान सहन करावे लागले आहेत. अक्षरशः आमचं घर महिना-महिना डिस्टर्ब राहिलं आहे, पण, आम्ही कोणाला हे सांगू शकत नाही. कारण- आमची जेवढी नावं मोठी आहेत, तेवढी त्यांचीही नावं मोठी आहेत. आम्ही इंडस्ट्रीत टिकू की नाही, तुम्हाला काम देणार नाही, पाच वर्षं तुम्हाला काम मिळणार नाही, अशा प्रकारची वक्तव्यं केली गेली आहेत. अर्थात, आता ते लोक नंतर पाच वर्षं कुठे दिसले नाहीत हा मुद्दा वेगळा आहे.”
हेही वाचा – अभिनेता सुयश टिळक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकला
“मला असं वाटलं, तुम्ही कलाकार म्हणून किती चांगले आहात यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून किती मोठे आहात, ही गोष्ट फार मोठी आहे. तुम्ही अभिनय आणि अनुभव शिकाल. मी अभिनयला म्हटलं, तुझा अभिनय एकेक वर्षानं विकसित होईल. तू चार-पाच वर्षांनंतर आणखी प्रगल्भ होत जाशील; पण माणूस म्हणून तुला आताच सगळं शिकावं लागेल. म्हणजे आता ज्या लोकांनी तुला त्रास दिला, त्यांच्याबद्दल डोक्यात राग ठेवू नको. ते लोक परत तुझ्या आयुष्यात चांगली म्हणून येणारच आहेत. त्यामुळे आपण माणूस म्हणून छान राहणं, विनम्र राहणं हे महत्त्वाचं आहे,” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.