खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. हा चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेच्या थरार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाद्वारे क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येणार आहे. सध्या अनेक कलाकार हा चित्रपट कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
अभिनेत्री प्रिया मराठे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतंच तिने शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली. याचे काही फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यावेळी तिने हा चित्रपट पाहिला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“हा एक चित्रपट नाही तर एक अनुभव आहे. मी ह्या टीमसोबत आधीही अनेक कामं केली आहेत, त्यामुळे एक जिव्हाळ्याची आपुलकीची भावना आहे. सगळ्यांच्या कामांची प्रशंसा करावी तितकी कमीच.. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर, मनवा नाईक, प्रतीक्षा लोणकर, पल्लवी वैद्य, हरीश दुधाडे आणि शिवप्रताप गरुडझेपच्या पूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..नक्की बघा”, असे प्रिया मराठेने यात म्हटले आहे.
आणखी वाचा : वडिलांचा फोटो पाहताच ढसाढसा रडल्या गौरी सावंत, म्हणाल्या “तुमच्यासारखा बाप…”
दरम्यान हा चित्रपट विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी डॉ. अमोल कोल्हे यांनी पेलली आहे. या चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मोगल बादशाह औरंगजेब आणि अभिनेत्री मनवा नाईक ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी सोयराबाई मोहिते या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जगदंब क्रिएशन’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.