नाटक, चित्रपट, राजकारण या सगळ्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवला. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. प्रिया बेर्डे यांनी एकट्याने त्यांच्या दोन्हीही मुलांचा सांभाळ केला. नुकंतच एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी त्या परिस्थितीचा कसा सामना केला, याबद्दल भाष्य केले.
प्रिया बेर्डे या तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत प्रिया बेर्डे झळकताना दिसणार आहेत. नुकतंच त्यांनी ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आजारपण आणि निधनानंतरचा संघर्ष याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “लक्ष्मीकांत गेल्यानंतर नाईलाज म्हणून मुलांना…”, प्रिया बेर्डेंनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या “माझ्या सासरची मंडळी…”
“लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा आजारी होते. त्यानंतर मला हे सर्व काही ठिक दिसत नाही, हे कळालं होतं. आपल्याला अनेक गोष्टी या कळत असतात. ते पर्व आता संपत आलेलं आहे आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आता आपल्यालाही सिंधुताई व्हावं लागणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा खूप आजारी होते, तेव्हा मी त्यांना माझ्या मुलासारखंच सांभाळलं. त्यावेळी मी तीन मुलांना सांभाळ करत होते.
मी त्या सर्व परिस्थितीला सामोरे गेले आहे. ते आता जेव्हा मी आठवते, तेव्हा मला अरे बापरे असं वाटतं. लक्ष्मीकांत बेर्डे, माझी आई, वडील निघून गेले याचा मी स्वीकार केला होता. पण त्यानंतर आलेल्या परिस्थितीचा सामना करताना मी ज्याप्रकारे संघर्ष केला आहे आणि जो त्रास मला झाला तो कोणीही सहन करु शकत नाही”, असे प्रिया बेर्डे यांनी म्हटले.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
“त्यावेळी तुमच्याबरोबर कोणीही नसतं. तुम्ही एकटे असता. त्यावेळी कोणीही मदतीला येत नाही. तेरा दिवस फक्त पाठीवर हात ठेवण्यासाठी लोक येतात. आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे सांगतात. पण त्यानंतर कोणीही येत नाही. त्यावेळी कोणी आलं नाही, तेच बरं झालं नाहीतर मी आता इथे नसते”, असेही प्रिया बेर्डे म्हणाल्या.