महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींना मोठं महत्त्व आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार आहे. यात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
रिंकू राजगुरुने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘खिल्लार’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये दोन बैल शर्यतीत धावताना दिसत आहे. यावर चित्रपटाचे नाव पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहे.
आणखी वाचा : “आमच्या दोघात…” रिंकू राजगुरुबरोबर अफेअरच्या चर्चांवर आकाश ठोसरचे थेट वक्तव्य
महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना “खिल्लार” शुभेच्छा. भिर्रर्रर्र… महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ … बैलगाडा शर्यत यावर लेखक-दिग्दर्शक मकरंद शशिमधु माने यांनी खिल्लार या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. या सिनेमाचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला आनंद आहे, असे रिंकू राजगुरुने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मराठी ही भावनिक भाषा नाही”, प्रवीण तरडेंचं वक्तव्य; म्हणाले “मराठीत शिवी दिली तर…”
न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे ‘खिल्लार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. तर मकरंद माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मूळचा पश्चिम महाराष्ट्रातला असल्यानं मकरंदनं बैलगाडा शर्यतींचं वातावरण अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यामुळेच आता हा विषय तो ‘खिल्लार’ चित्रपटातून मांडत आहे.
या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.