आज सर्वत्र मकरसंक्रांत साजरी केली जात आहे. दरवर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. पण यावर्षी मकरसंक्रांतीचा सण १५ जानेवारीला आला आहे. त्यामुळे आज सर्वजण ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत मकरसंक्रांत साजरे करत आहेत. कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक व्हिडीओ समोर आला; ज्यामध्ये ती तिळाचे लाडू वाटून मकरसंक्रांत साजरी करताना दिसत आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकरचा हा व्हिडीओ Voompla या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सई सगळ्यांना तिळाचे लाडू वाटताना दिसत आहे. याचदरम्यान ती बाजूला असलेल्या बैलाला देखील तिळाचा लाडू भरवताना पाहायला मिळत आहे. सईचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
दरम्यान, सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २ फेब्रुवारीला सई व सिद्धार्थचा ‘श्रीदेव प्रसन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा – “…झरझर मोठ्या होतात लेकी”, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत, मुलीचे फोटो शेअर म्हणाली…
‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी यांनी केली आहे. या चित्रपटात सई व सिद्धार्थ यांच्याबरोबर संजय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे हे कलाकार झळकणार आहेत.