लोकप्रिय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar) लवकरच ‘गुलकंद’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात समीर चौगुले, प्रसाद ओक हेदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. त्याबरोबरच अभिनेत्री इमरान हाश्मीबरोबर ग्राउंड झिरो या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात ललित प्रभाकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या वडिलांनी तिला काय सल्ला दिला होता यावर वक्तव्य केले आहे.

सई ताम्हणकर काय म्हणाली?

सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी ‘लोकमत सखी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत आई-वडिलांनी काय शिकवण दिली, यावर तिने वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “आई-वडिलांनी माझे लाडही केले आहेत आणि तितकाच मी मारही खाल्ला आहे. मी हँगर, चप्पल, लाटणे या सगळ्या गोष्टींनी मार खाल्ला आहे. लहानपणी मी खूप दंगेखोर मुलगी होते. थोडीशी बंडखोरही होते. एखादी गोष्ट करू नकोस, असं सांगितलं, तर मला ती आधी करून बघायची असायची.”

पुढे अभिनेत्री म्हणाली, “खूप छान छान गोष्टी, शिकवणी मला माझ्या आई-वडिलांकडून शिकता आल्या. माझ्या वडिलांनी सांगितलेल्या दोन गोष्टी माझ्या अजून लक्षात आहेत. कुठलंही काम अंगावर पडलं तरी त्याचा कमीपणा वाटून घ्यायचा नाही. म्हणजे उद्या जर आपल्यावर झाडू मारायची वेळ आली, तरी त्याचा कमीपणा वाटला नाही पाहिजे. तेवढ्याच निष्ठेनं ते काम झालं पाहिजे. त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली होती की, मी कधीच माझ्या आयुष्यात कुठल्याच पॉइंटला तुझ्यासाठी शिक्षणासाठी कर्ज, पैसे भरून अॅडमिशन किंवा वशिला लावून अॅडमिशन करणार नाही. तुला स्वत:ला सिद्ध करावं लागेल. त्यानुसार तुझा प्रवास होईल. तर मला असं वाटतं की, मला हे अत्यंत बेसिक; पण अत्यंत खमके संस्कार खूप लवकर मिळाले.”

सई ताम्हणकर लहानपणी तिला कोणत्या गोष्टीचा राग यायचा, यावर बोलताना म्हणाली, “मला लहानपणी एका गोष्टीचा राग यायचा की, जर मी आईला सांगितलं की, मला अमुक ही भाजी उद्या डब्याला नको. तर मला दोन दिवस तीच भाजी मिळायची. मला आता कळतंय की त्या गोष्टीमुळे मी सगळ्या भाज्या खाते. मी जगात कुठेही गेले तरी जेवणासाठी माझं कुठे काही अडत नाही”, असे म्हणत लहानपणी आई-वडिलांनी लावलेल्या शिस्तीचा आज उपयोग होत असल्याचे वक्तव्य सई ताम्हणकरने केले.

दरम्यान, सई ताम्हणकरचा गुलकंद हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. तसेच, तिची प्रमुख भूमिका असलेला ‘ग्राउंड झिरो’ चित्रपट २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.