आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसत आहे. या दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेत्री सई ताम्हणकरने प्रतिक्रिया दिली आहे.
सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सईने ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिला. यानंतर तिने तिला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने अनेकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
“तुम्ही शेवटचा असा कोणता चित्रपट पाहिला आहे, ज्याचा तुमच्यावर परिणाम झाला? तुमच्यात काहीतरी बदल झाले? म्हणजे तुम्ही प्रवास करता, त्यावेळी काही गोष्टी निश्चित बदलतात, पण काय बदलत हे तुम्हाला सांगता येत नाही.
मी आता असं काही तरी पाहिलं जे माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट पाहा भावांनो!!!”, असे सई ताम्हणकरने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”
दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसते. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.