अभिनेत्री मृणाल कुलकर्णी लवकरच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटात त्यांनी ज्ञानेश्वरांच्या आईची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत वक्तव्य केले होते.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात अभिनेत्री स्मिता शेवाळेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता अभिनेत्री स्मिता शेवाळेने मृणाल कुलकर्णींबाबत वक्तव्य केले आहे. तिने मृणाल कुलकर्णींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊ…
त्या पायाला हात…
अभिनेत्री स्मिता शेवाळेने नुकताच ‘तारांगण’बरोबर संवाद साधला. यावेळी मृणाल कुलकर्णींबरोबर काम करण्याचा अनुभव तिने सांगितला. अभिनेत्री म्हणाली, “मृणाल ताईंबरोबर पहिल्यांदा मला स्क्रीन शेअर करता आली, म्हणजे मी ‘सुभेदार’ या चित्रपटात होते. आम्ही एका स्क्रीनवर होतो, पण आमचे संवाद नव्हते. आता या चित्रपटात संवाद आहेत. थोडा ऑकवर्ड सीन आहे. तो सीन करताना असं वाटलं होतं की हा सीन मृणालताईंबरोबर कसा करायचा? माझ्या पायात काटा रुतलेला असतो, तो काटा मृणालताई काढतात, असा सीन आहे. त्या पायाला हात लावतात, त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. तो सीन लवकर संपावा असं वाटलं होतं. इतकी मोठी, गुणी अभिनेत्री, जिला लहानपणापासून बघत आली आहे, त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी शिकली आहे; त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं”, असे म्हणत मृणाल कुलकर्णींबरोबर स्क्रीन शेअर केल्याचा आनंद असल्याचे स्मिता शेवाळेने म्हटले आहे.
मृणाल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी म्हटले होते की, संत ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी हीच आपली नियती आहे, म्हणून त्याचा स्वीकार केला. लहानपणापासून त्यांच्याबद्दल ऐकताना अंगावर काटा यायचा. विठ्ठलाच्या चरणी त्यांनी चारही मुलांना समर्पित केलं. पण, आता ती भूमिका साकारताना हे शक्य नाहीये असं वाटलं. त्यांच्यातही दैवत्व असलं पाहिजे, त्याशिवाय हे शक्य नाहीये.
स्मिता शेवाळे हिंदी, मराठी मालिका, तसेच मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. दिग्पाल लांजेकर यांनी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे.