कलाकार हे त्यांच्या चित्रपटांमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील ते चर्चेत असतात. सोशल मीडियावर कलाकारांनी शेअर केलेल्या व्हिडीओ, रील्स आणि फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. अनेकदा कलाकार सोशल मीडियावर कामासंबंधी किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी, काही आठवणीदेखील शेअर करताना दिसतात. आता मराठी अभिनेत्री स्मिता तांबे (Smita Tambe) सध्या तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. स्मिता तांबेने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
स्मिता तांबे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काय म्हणाली?
स्मिता तांबेने सोशल मीडियावर मतदान केल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीने मतदान केल्यानंतर फोटो काढला आहे. तिच्या पतीने आणि लहान मुलीनेदेखील पोज दिल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने छानशी पोस्टही लिहिली आहे. अभिनेत्री लिहिते, “जिजा १५ वर्षे वाट बघू शकत नाहीये. तिला आजच मतदान करायचं होतं. मला पेनाची शाई तिच्या बोटांना लावावी लागली. हा उत्साह असाच आयुष्यभर टिकून राहावा यासाठी प्रयत्न तर करावे लागणार.”
अभिनेत्रीने ‘या’ चित्रपटांत केले आहे काम
‘७२ मैल प्रवास’, ‘सिंघम रिटर्न्स’, ‘उमरिका’, ‘परतु’, ‘अज्जी’, ‘रूख’, ‘जोरम’, ‘जवान’, ‘लगन’, अशा चित्रपटांत दमदार अभिनय करत अभिनेत्री स्मिता तांबेने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिला तिच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज यांमधून अभिनेत्री प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. ‘जोगवा’, ‘देऊळ’ या मराठी चित्रपटांतील तिच्या भूमिकांचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, बॉलीवूडसह अनेक मराठी कलाकारांनी मतदान केल्यानंतर फोटोंसाठी पोज दिली होती. कलाकारांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.