बिगबजेट असलेला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. ५०० कोटी रुपये खर्च करून केलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन, फहाद फासिल व रश्मिका मंदाना यांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यामुळेच टीझर असो किंवा गाणी प्रेक्षकांनी याला उदंड प्रतिसाद दिला आहे. पण असं असलं तरी प्रेक्षकांना सहा महिने ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची वाट पाहणं निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी वीएफएक्स व काही सीनच्या चित्रीकरणाच्या कारणास्तव ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट १५ ऑगस्ट ऐवजी ६ डिसेंबर २०२४ला प्रदर्शित होणार आहे.
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणी प्रदर्शित झाली आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘सूसेकी’ गाण्याची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली आहे. सोशल मीडियावर या गाण्यावरील डान्स व्हिडीओंनी धुमाकूळ घातला आहे. अशातच पुन्हा एकदा महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी ‘सूसेकी’ गाण्यावर थिरकली आहे. याआधी तिनं ‘सूसेकी’ गाण्याचं हिंदी व्हर्जन असलेलं ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. ड्रेसची लुंगी करत सोनाली केलेला हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. १० मिलियनहून अधिक व्ह्यूज तिच्या या व्हिडीओला मिळाले होते.
आता पुन्हा सोनालीनं अल्लू व रश्मिकाच्या ‘सूसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. पण यावेळीस तिनं एकटीनं नव्हे तर तिच्या साथीला तीन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकही डान्स करताना पाहायला मिळत आहे. ‘सूसेकी’ व ‘लाजरान साजरा मुखडा’ या फ्युजन गाण्यावर सोनालीनं नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य, आशिष पाटील आणि फुलवा खामकरबरोबर डान्स केला आहे. चौघांच्या या डान्स व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं सहा भाषेत प्रदर्शित झालं आहे. सहाही भाषांमध्ये हे गाणं सुपरहिट झालं आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. तर श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा गणेश आचार्य यांनी सांभाळली आहे.
हेही वाचा – “तुमचा ब्रेकअप झाला होता का?” ऐश्वर्या नारकरांच्या ‘त्या’ व्हिडीओवर चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाल्या…
सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर याचवर्षी सोनालीनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.