दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाची सध्या सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अजून बरेच दिवस प्रदर्शनाला बाकी असेल तरी चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील गाण्यांप्रमाणेच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली आहेत. सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ‘अंगारों’ गाण्याची भुरळ पडली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील या गाण्यावर जबरदस्त डान्स केला असून तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.
फोटोग्राफर शशांक सानेने सोनाली कुलकर्णीचा ‘अंगारों’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली सुंदर अशा आकाशी रंगाच्या ड्रेसची लुंगी करून ‘अंगारों’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुन व रश्मिकाची गाण्यातील हुबेहूब हुकस्टेप सोनाली करताना दिसत आहे.
हेही वाचा – “दुसरा नवरा बनून नको येऊ…”, ‘आई कुठे काय करते’मधील ऋषी सक्सेनाची एन्ट्री चाहत्याला खटकली, अभिनेता म्हणाला…
सोनालीच्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. “कडक”, “अखिल भारतीय अण्णाची लुंगी गँगच्या अध्यक्ष सोनाली अण्णा”, “ही फॅशन भारी होती”, “सोनाली अण्णा”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांची व्हिडीओवर दिल्या आहेत.
‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाणं सहा भाषेत प्रदर्शित झालं असून सहाही भाषांमध्ये हे गाणं सुपरहिट झालं आहे. प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे. तर श्री प्रसादने संगीतबद्ध केलं आहे. तसंच या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा गणेश आचार्य यांनी सांभाळली आहे.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर याचवर्षी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारीला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. आता लवकरच ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd