मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायमच प्रसिद्धीझोतात असते. सोनालीने करोना काळात लॉकडाऊनमध्ये कुणाल बेनोडेकर लग्नगाठ बांधली. मात्र त्या दोघांची पहिली भेट कधी, कुठे आणि कशी झाली होती, याबद्दल तिने कधीही भाष्य केले नव्हते. नुकतंच एका मुलाखतीत सोनालीने याबद्दलचे गुपित उलगडले आहे.
सोनाली कुलकर्णी ही लवकरच ‘डेट भेट’ या चित्रपटात झळकणार आहे. यात ती अभिनेता हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझी कुणालबरोबर पहिली भेट कधी आणि कुठे झाली, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर देत खुलासा केला.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाबद्दल केदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले “याचा शेवट…”
“आम्ही दोघंही बऱ्याच काळापासून एकमेकांबरोबर चॅटिंग करत होतो. मग मी ठरवलं की त्याला भेटायला जाऊया. मी एका शूटच्या निमित्ताने लंडनला गेले होते आणि मग तिथे त्याला भेटले. १२ सप्टेंबरला रात्री ९ ते ९.३० ला आम्ही भेटलो होतो. तो फोटोत दिसतो, त्याचप्रमाणे दिसत होता. त्याचे सोशल मीडियावर फिल्टर फोटो नव्हते”, असे सोनाली म्हणाली.
“मला ती गोष्ट आवडली. त्यांनतर आम्ही बोललो, एका ठिकाणी पिझ्झा खायला गेलो. मला त्या डेटची एक कायम लक्षात राहणारी एक गोष्ट म्हणजे तेव्हा मला अजिबात ओळखत नव्हता. त्याला माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याने माझं इन्स्टाग्रामवर माझं प्रोफाईल पाहिलं आणि त्यानंतर त्याला माझ्याबद्दल समजलं. त्याने त्यावेळी मला विचारलेलं की “तुझं ते सर्वात प्रसिद्ध गाणं कोणतं?” मी त्याला म्हणाले, “अप्सरा आली.” यानंतर तो मला पटकन म्हणाला, “याचं मोहम्मद अलीशी काही कनेक्शन आहे का?” असा गंमतीशीर किस्साही तिने सांगितला.
“यानंतरच मग मी ठरवलं की हाच तो मुलगा ज्याच्याबरोबर मी माझं आयुष्य काढायला हवं. कारण याला आपल्याबद्दल काहीही माहिती नाही”, असेही सोनालीने म्हटले.
आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या
दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. सोनाली आणि कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्या दोघांनी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली.