सांगली येथील राजमती क्रिडांगणावर भव्य सांस्कृतिक महोत्सव सादर झाला. या कार्यक्रमाता सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सुप्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केलं आणि महासंस्कृती महोत्सवाला चार चाँद लावले. सोनाली कुलकर्णीला महासंस्कृती महोत्सवात राजाश्रयाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा आम्हा कलाकारांसह स्थानिक कलाकारांनाही राजाश्रय मिळतो आहे असं सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे सोनाली कुलकर्णीने?
“आम्हा कलाकारांना राजाश्रय मिळतो आहे, तसंच स्थानिक कलाकारांनाही राजाश्रय मिळतो आहे. मी महासंस्कृती महोत्सवात विविध जिल्ह्यांमध्ये सहभाग घेत आता सांगलीत पोहचले आहे. लातूर, जालना, पुणे, मुंबई हे या सगळ्यानंतर सांगलीत आले आहे. बऱ्याच वर्षांनी नृत्य सादर करण्याची संधी मला मिळाली. मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. आम्हा कलाकारांना हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करुन दिलं तो महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग, प्रशासन यांचेही मी आभार मानते आहे.”
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन
“प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसांचा संस्कृती महोत्सव सुरु आहे. वेगवेगळे कलाकार वेगवेगळी कला सादर करत आहेत. नाटक, सिनेमा, मालिका यांसह सगळ्या कलाकारांना महाराष्ट्र सरकारने हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं आहे. जिल्हा प्रशासनाचे, महाराष्ट्र शासनाचे मी याबद्दल आभार मानते आहे. सांगलीत सुंदर आयोजन करण्यात आलं आहे. मी सांगलीकरांना विनंती करेन की तुम्ही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला या. महाराष्ट्राच्या सुंदर संस्कृतीचा भाग व्हा.” असं आवाहनही सोनालीने केलं आहे.
हे पण वाचा- महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीवर आली होती सिनेसृष्टी सोडण्याची वेळ, असं काय घडलं होतं?
सांगली जिल्हा महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सुमनताई खाडे, अप्पर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या छोट्याश्या मुलाखतीत सोनाली कुलकर्णीने कलाकारांना राजाश्रय मिळतो असं म्हटलं आहे.