स्पृहा जोशी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, तिने आजवर सिनेमे व मालिकांमधून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे. सध्या ती कलर्स मराठीवरील ‘सुख कळले’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या स्पृहाला एका मुलाखतीत इंडस्ट्रीत आडनावांवरून काम मिळतं, अशा आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.
मराठी इंडस्ट्रीत आडनावांच्या आधारे भेदभाव केला जातो, आडनाव पाहून काम दिलं जातं, असे आरोप बरेचदा केले जातात. एकदा ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाईक यांनीही काही विशिष्ट आडनावांचा उल्लेख करत इंडस्ट्रीतील भेदभावांबद्दल त्यांचं परखड मत मांडलं होतं. एका मुलाखतीत अभिनेत्री स्पृहा जोशीला याबाबत विचारण्यात आलं.
स्पृहा जोशीने ‘आरपार’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिला काही प्रश्न विचारण्यात आले, त्याची तिने मनमोकळेपणाने उत्तरं दिली. ‘सगळं बऱ्यापैकी आरामात मिळालं, असे काही आरोप तुझ्यावर कधी झाले का?’ या प्रश्नावर स्पृहा जोशी म्हणाली, “नशिबाने असा कुठलाही आरोप आजपर्यंत तरी झालेला नाहीये. मी एका ठराविक आडनावाची आहे म्हणून मला काम मिळालं बाबा, असं अजून तरी कोणी उठून म्हटलेलं नाही. कारण काय आहे शेवटी कुणालाच तो संघर्ष चुकत नाही, एका कामामागून दुसरं काम मिळायला सुद्धा तुम्हाला सतत स्वतःला तिथे सिद्ध करतंच राहावं लागतं ना. आपल्या क्षेत्रामध्ये इतकं प्लॅटर वरती आणून कोणीच काही देत नाही.”
पुढे स्पृहा म्हणाली, “मला असं मात्र नक्की वाटतं की मला काम करताना माणसं खूप चांगली मिळत गेली. पण अगदी सुरुवातीच्या काळापासून आयएमईमध्ये मी काम केलं, म्हणजे रंगा काकांबरोबर असेल किंवा विनोद दादा असेल, सतीश राजवाडे असेल, यांच्या सगळ्यांबरोबर अगदी सुरुवातीच्या काळातली माझी काही कामं होती. तर पुन्हा एकदा ते जडणघडण होताना अशी चांगली माणसं सोबत असणं त्याच्यामुळे तुमच्या कलेवर पण परिणाम होत असतो.”
दरम्यान, स्पृहा जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपल्या मालिकेतील सेटवरचे मजेदार फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तसेच स्पृहा स्पष्टवक्तीदेखील आहे. ती अनेक विषयांवर तिची मतं स्पष्टपणे मांडत असते.