मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी स्पृहा जोशी सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुख कळले’ मालिकेत पाहायला मिळत आहे. अलीकडेच सुरू झालेल्या स्पृहाच्या या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत स्पृहाने मिथिलाची भूमिका साकारली आहे; जी प्रेक्षकांना अल्पावधीतच पसंतीस पडली आहे. अशातच आज स्पृहाचा ‘शक्तिमान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात स्पृहा अभिनेता आदिनाथ कोठारेबरोबर झळकली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे प्रमोशन करताना दोघं एकत्र दिसत आहेत. सध्या स्पृहाच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत तिने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता सादर केली आहे.
‘शक्तिमान’ चित्रपटाच्या निमित्ताने स्पृहा जोशी व आदिनाथ कोठारेने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीच्या वेळी स्पृहाने बाबांसाठी लिहिलेली सुंदर कविता सादर केली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. स्पृहा कविता सादर करताना म्हणाली, कवितेचं नाव आभाळ असं आहे. आभाळ म्हणजे बाबा असं इमॅजिन करा.
आभाळ
गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळंकुट्ट आभाळ, भीती वाटते त्याची कधी कधी, सारं आसमंत व्यापून टाकलेलं असतं त्याने, पळणारं तरी कुठे आपण त्याच्यापासून? त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच? फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने? विजेचा तिसरा डोळा भयकारी रागामध्ये, आगीत लपेटून टाकेल आपल्याला. जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं, एवढंच आपल्या हातात, त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय, मान वर करून पाहण्याची सुद्धा हिंमत नाही. सृष्टीच्या आतलं काहूर जाणवतं असतं खरंतर, तिची इच्छा असते, आपला संवाद घडावा आभाळाशी…पण तीही मुक्याने कडू सत्य पचवत राहते…आतले कण आतमध्येच दाबत राहते… हळूहळू अंतर वाढतं, वाढतच जात…क्रांती करायला लागत मन, वाढत्या वयानुसार… आभाळाचं अस्तित्वच झुगारून द्यायला लागतं…धाडस करतं त्याला नजरेला नजर देण्याचं, ताठ मानेने त्याच्या समोर उभं राहण्याचं…आता हळूहळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं, वयानुसार अनुभवाने निवळायला लागतं, अशीच कधी नजरं जेव्हा आभाळावर जाते, काळेभोर क्रद्ध ढग निघून गेलेले असतात…आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव दिसतात. शांत निरभ्र आभाळ तेव्हा कौतुकाने पाहतं, काहीतरी आपल्या मनात उगाच दाटून येतं. हात पसरून, वय विसरून आपण मोठे होतो, थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो. आभाळाच्या डोळ्यांत तेव्हा आनंदाश्रु दाटून येतात, सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात.
हेही वाचा – Video: RCB VS RR सामन्यादरम्यान जान्हवी कपूरवर सेल्फीसाठी चाहत्यांनी फेकले फोन, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, स्पृहा मालिका, चित्रपट व्यतिरिक्त रंगभूमीवर देखील अविरत काम करत आहे. तिचं ‘स्पृहा व्हाया संकर्षण’ हा कवितेचा कार्यक्रम रंगभूमीवर सध्या जोरदार सुरू आहे. या कार्यक्रमात तिची साथ अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देत आहे. आता या कार्यक्रमाचा प्रयोग सिंगापूर होतं आहे.