मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून सुहास जोशींना ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुहास जोशींनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी मराठीतील सुपरहिट चित्रपट ‘काकस्पर्श’ नाकारला असल्याचा खुलासा केला आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘काकस्पर्श’ चित्रपट खूप गाजला. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. या चित्रपटात सचिन खेडेकर, प्रिया बापट, मेधा मांजरेकर, केतकी माटेगावकर, वैभव मांगले, सविता मालपेकर यांच्यासारखी मोठी स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशींनाही विचारण्यात आले होते. मात्र, एका कारणासाठी त्यांनी हा चित्रपट नाकारला. नुकतेच सुहास जोशींनी त्या कारणाचा खुलासा केला आहे.
सुहास जोशी म्हणाल्या, “काकस्पर्श चित्रपटाच्या वेळी महेशने मला फोन केला होता. म्हणाला, सुहास ताई तुमच्यासाठी एक मस्त भूमिका आहे. मी महेशला विचारलं, शूटिंग कुठे आहे? तो म्हणाला, कोकणात. मग मी माझ्याकडे पाहिलं व विचारलं, महेश नऊवारी नेसायची आहे का? त्यावर तो म्हणाला हो. मी म्हणाले, मग मला नको घेऊस, कारण ‘कुंकू’ मालिकेत अडीच वर्ष नऊवारी नेसल्यानंतर मी ठरवलं होतं की यापुढे मी नऊवारी नेसणार नाही.”
सुहास जोशींच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नाटक, मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली इंदू डार्लिंग हे पात्र चांगलेच गाजले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी सुहास जोशींना २०१८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.