जॉन मॅथ्यू मॅथन दिग्दर्शित ‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९९९साली प्रदर्शित झालेल्या ‘सरफरोश’ चित्रपटात अभिनेता आमिर खान, सोनाली बेंद्रे, नसीरुद्दीन शाह, मकरंद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, स्मिता जयकर, मनोज जोशी, आकाश खुराना, गोविंद नामदेव, अशोक लोखंडे, सुकन्या मोने असे तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील गाणी सुपरहिट झाली होती. अजून प्रेक्षक आवडीने ‘सरफरोश’ चित्रपट आणि त्यातील गाणी पाहत असतात.
‘सरफरोश’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नुकतंच चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने उपस्थिती लावली होती. मराठीतील सध्या आघाडीच्या अभिनेत्री सुकन्या मोनेंनी देखील ‘सरफरोश’ चित्रपटाच्या खास शोला हजेरी लावली होती. यासंदर्भात त्यांनी एक नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने आई-वडिलांना दिलं खास सरप्राइज, घेतला ‘सुवर्णरथ’
आमिर खान, सोनाली बेंद्रेबरोबरचे फोटो शेअर करत सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे, “कालचा दिवस खास होता…माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडतं होतं…आपण एखादा चित्रपट करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो…पण ‘सरफरोश’ हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे. आमिर खान माझा लाडका अभिनेता त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती. माझी आणि जॉन मॅथ्यू मॅथनची पहिली भेट…दिल्लीतले चित्रीकरण….माझी, सोनालीची आणि स्मिता जयकरची झालेली घट्ट मैत्री…आम्ही केलेली धमाल…त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्यानिमित्ताने @radionashaने ठेवलेला खास शो…. थँक्यू सो मच @rotalks…त्यानिमित्ताने झालेलं रीयूनियन…”
“सगळ्या जुन्या आठवणी…शूटिंग दरम्यान झालेल्या गमती जमती…इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी… आमिरचं मराठी बोलणं, वागण्यातला आपलेपणा, काळजी…मनोज जोशीची भेट….जॉन आणि आभाचे अगत्याचे आमंत्रण…जॉनचा साधेपणा… त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा…भारवून गेले होते…पुन्हा पुन्हा भेटत राहू सोनाली बेंद्रे, स्मिता जयकर, जॉन मॅथ्यू मॅथन, आमिर खार, मनोज जोशी, मकरंद देशपांडे….पुन्हा एकदा धन्यवाद…’सरफरोश २’ चित्रपटाची आता वाट पाहतेय,” असं सुकन्या मोनेंनी लिहिलं आहे.
सुकन्या मोनेंच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री सारिका नवाथे, रुजुता देशमुख, मयुरी देशमुख, गौरव घाटणेकर, अक्षर कोठारी, सुखदा खांडकेकर, नम्रता संभेराव, अनघा अतुल अशा अनेक कलाकारांनी सुकन्या मोनेंच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.