अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेबरोबर वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेले चित्रपट करताना दिसत आहे. आज, २० डिसेंबरला तिचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ प्रदर्शित झाला आहे. आनंद गोखले दिग्दर्शित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटात तेजश्री गायत्रीच्या भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात तेजश्रीसह अभिनेता सुबोध भावे, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, उदय नेने, संजय खापरे, प्रदीप वेलणकर अशी बरीच तगडी कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री प्रधान, सुबोध भावे विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी दोघं लग्नसंस्थेविषयी आपली परखड मत मांडताना पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिला कसा जोडीदार हवाय? हे देखील सांगितलं आहे.
‘माय महानगर मानिनी’शी संवाद साधताना तेजश्री प्रधानला विचारलं की, खऱ्या आयुष्यात तुला तुझ्या जोडीदारासाठी काय अटी आहेत? तुला कसा जोडीदार हवाय? तर तेजश्री म्हणाली, “अटी असतात. पण मला वाटतं, अपेक्षांचं कसं आहे माहितीये का, एखादी पेन्सिल नवीन घेतो आणि त्याला शार्पनर करतो. तेव्हा ती खूप शार्प असते. आपण त्याने खूप लिहितो आणि मग त्याचा शार्पनेस बोथट होऊन जातो. त्याचा शार्पनेस निघून जातो. तसं मला वाटतं अनुभवाचं असतं किंवा तुमच्या अपेक्षांचं असतं. जसं तुमचं आयुष्य आणि वय पुढेपुढे जात असतं, तेव्हा आपण १०० अटींवरून इथंपर्यंत येतो की, एक सच्चा आणि खरा माणूस आपल्या आयुष्यात यावा. याच्या पलीकडचं सगळं निभावलं जाईलच. फक्त नात्यात खरेपणा असावा. आता इतकंच उरलंय.”
हेही वाचा – Year Ender 2024: यंदा बॉलीवूडच्या कोण-कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला, जाणून घ्या…
दरम्यान, तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेतील तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच तिच्या या मालिकेला टीआरपी देखील चांगला मिळत आहे.