मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तेजस्विनीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत तेजस्विनीने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. दरम्यान, तेजस्विनी लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर तेजस्विनी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. एवढंच नाही तर आपल्या नव्या प्रोजक्टबद्दलही ती चाहत्यांना माहिती देत असते. चाहतेही तिच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच तेजस्विनीने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. तेजस्विनी एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ असे तेजस्विनीच्या अगामी चित्रपटाचे नाव आहे. राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात तेजस्विनी जिजाऊची भूमिका साकारणार आहे.
तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या भूमिकेची झलकही दाखवली आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले, “म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात. दिल्लीपती कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती”ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला, स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय.” तेजस्विनीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटांतील तिची भूमिका चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती प्रसाद खांडेकरने केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिनयाबरोबरच तेजस्विनीने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.