मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक तेजस्विनी पंडित ही कायम तिच्या कामामुळे चर्चेत असते. चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांमधून हटके भूमिका साकारत तेजस्विनीने स्वतःचं या क्षेत्रातील अभिनेत्री म्हणून स्थान पक्क केलं आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अथांग’ मराठी वेबसीरिजच्या माध्यमातून सध्या ती चर्चेत आहे.
नुकतंच तेजस्विनीने सिनेपत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या ऑडिओ पॉडकास्टसाठी एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने निर्मिती क्षेत्रात आल्यावर तिला आलेल्या अनुभवांचा खुलासा केला आहे. शिवाय मराठी चित्रपटसृष्टीत तिच्याबद्दल जे गैरसमज पसरले आहेत त्यावरही तेजस्विनीने स्पष्टीकरण दिले आहे.
आणखी वाचा : ‘Scam 2003 The Telgi Story’ ही आगामी वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल
मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते कलाकारांना वेळेवर पैसे देत नाहीत ही कुरबुर आपण बऱ्याचदा ऐकली आहे. याबाबतीत मात्र तेजस्विनीने अत्यंत स्पष्ट उत्तर दिलं आहे. बरेच लोक तिला माजोरडी म्हणतात असं तिचं मत आहे यावरही तेजस्विनीने प्रकाश टाकला आहे. ती म्हणाली, “माझ्यात प्रचंड माज आहे असं बऱ्याच लोकांना वाटत असलं तरी माझ्याबरोबर काम करणारी एकही व्यक्ती असं कधीच म्हणणार नाही. त्यांना महितीये मी माजोरडी नाहीये. शिवाय माझ्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मी वेळच्या वेळी पैसे दिले आहेत.”
तेजस्विनी पंडितने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. याबरोबरच तिने साकारलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं. नुकतंच तेजस्विनीने ‘अथांग’ वेबसीरिजची निर्मिती केली आहे. यात तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. यात संदीप खरे, निवेदिता जोशी- सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.