‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते या ‘शशी’ हे पात्र साकारत आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील वंदना गुप्ते यांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वंदना गुप्ते यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा एक किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”
मी एकदा मुंबईहून पुण्याला जात होते. माझ्या नाटकाचा पुण्याला प्रयोग होता. तेव्हा ड्रायव्हर आला नव्हता, त्यामुळे मी एकटीच गाडी घेऊन निघाले. मी इनोव्हा घेऊन प्रवास करत होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर एका मंत्र्याची गाडी चालली होती. त्या मंत्र्याच्या गाडीच्या मागे, पुढे बाजूला बंदूकधारी पोलिसांच्या तीन गाड्या होत्या. मला ओव्हरटेक करायलाच देत नव्हते.
माझा ५ वाजता प्रयोग होता. त्यावेळी जवळपास २ वाजले होते. मी जोरजोरात हॉर्नही देत होते. पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यानंतर मी गाडी मंत्र्याच्या ताफ्यात घुसवली आणि त्या मंत्र्याला सांगितलं, “काच खाली करा. त्यावेळी आत कोण मंत्री बसला हे मला माहिती नव्हतं. माझा पाच वाजता प्रयोग आहे. पण तुमचे सुरक्षारक्षक मला पुढे जाऊ देत नाही.”
त्यावेळी त्या गाडीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बसले होते. त्यांनी “मला कोण तुम्हाला अडवतंय”, असं मला विचारलं. “मी त्यांना तुमचे पोलीस” असं म्हटलं. तर त्यावर त्यांनी जा, मी त्यांना सांगतो, असं म्हणत मला रस्ता मोकळा करुन दिला, असा किस्सा वंदना गुप्तेने सांगितला आहे.
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.