केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे उलटले आहेत. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्री वंदना गुप्तेंनी मंगळागौर म्हणजे काय? याबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
‘बाईपण भारी देवा’ च्या संपूर्ण टीमने नुकतंच चित्रपटाच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन केले. यावेळी या चित्रपटातील सर्वच कलाकार उपस्थित होते. यादरम्यान केदार शिंदेनी वंदना गुप्तेंचा मुलाखतीवेळीचा एक मजेशीर किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “माझा प्रयोग होता अन्…” वंदना गुप्तेंनी पृथ्वीराज चव्हाणांच्या ताफ्यात घुसवलेली गाडी; म्हणाल्या “त्यांचे सुरक्षारक्षक…”
यावेळी केदार शिंदे म्हणाले, “आम्ही एका मुलाखतीला गेलो होतो. त्यावेळी अनेक हिंदी आणि इंग्रजी पत्रकार मंगळागौर म्हणजे काय? असा प्रश्न विचारला. तेव्हा वंदना ताईंनी फारच मजेशीर उत्तर दिले.”
हा किस्सा सांगताना वंदना गुप्ते म्हणाल्या, “मला एका पत्रकाराने मंगळागौर म्हणजे काय? असे विचारले होते. तिला याबद्दल माहिती नव्हती. मी तिला म्हटलं, लग्नानंतर सर्व सभारंभ, सोहळे संपतात. त्यानंतर मग हनिमूनला जातात. त्याचा सर्व ताण काढण्यासाठी जे खेळ खेळले जातात, त्याला मंगळागौर म्हणतात. हा खेळ फार मजेशीर असतो. सासूला शिव्या द्या, नणंदेला शिव्या द्या असं सर्व त्यात असतं.”
दरम्यान ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.