अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते(Vandana Gupte) हे नुकतेच ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटात त्यांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. लोकेश गुप्तेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी विविध माध्यमांमध्ये मुलाखती दिल्या. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्सेदेखील सांगितले. आता एका मुलाखतीत वंदना गुप्ते अशोक सराफ यांच्या मैत्रीबाबत वक्तव्य केले आहे.

आमच्यातील बॉण्डिंग खूप…

राजश्री मराठीला वंदना गुप्ते, अशोक सराफ व लोकेश गुप्ते यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत अशोक सराफ यांच्याबरोबरच्या मैत्रीवर वंदना गुप्ते म्हणाल्या, “अशोक माझ्या मोठ्या बहिणीचा भारतीचा मित्र आहे. त्यांनी नाटकांत एकत्र काम केलं होतं. नाटकांत काम करताना कलाकारांना एकमेकांचा सहवास जास्त मिळतो. माझा आणि अशोकचा संबंध हा नाटकांमुळे नाही, तर काही सिनेमांत आम्ही एकत्र काम केलं. “

“अशोक हा माणूस नट म्हणून श्रेष्ठ आहेच; पण माणूस म्हणूनही श्रेष्ठ आहे. दोन्हींचं चांगलं कॉम्बिनेशन असणारे फार कमी लोक इंडस्ट्रीमध्ये असतात. आपला मोठेपणा घेऊन मिरवणारे खूप आहेत. पण, मोठा असूनही आपलं माणूसपण जपणारा, मैत्री जपणारा असा अशोक आहे. ती मैत्री दिसते. माझी आणि अशोकची निवेदितामुळे दोस्ती जमली. आमच्यातील बॉण्डिंग खूप छान आहे. मैत्रीच्या पलीकडे जाऊन एक वेगळा बॉण्ड तयार होतो, तसं आमच्यात बॉण्डिंग आहे. काहीही, कशीही मस्ती केली त्याच्याबरोबर, तरी त्याला चालतं.” असे गमतीने वंदना गुप्ते म्हणाल्या. “त्याला आवडतं की नाही माहीत नाही, मी मस्ती करते. छान मैत्री असलेला उत्तम नट जर आपल्याला मिळाला, तर त्याचा आपल्या करिअरला फायदा होईल. या स्वार्थी भावनेनेसुद्धा मी त्याच्याशी मैत्री टिकवली आहे”, असे वक्तव्य करीत वंदना गुप्ते यांनी अशोक सराफ यांचे कौतुक केले.

चित्रपटांबरोबरच वंदना गुप्ते सध्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. तर अशोक सराफ सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.