केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. या चित्रपटात वंदना गुप्ते यांनी साकारलेली भूमिका खूप गाजत आहे. नुकतंच वंदना गुप्ते यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबाबतचा खुलासा केला आहे.
वंदना गुप्तें म्हणाल्या “साहित्य संघाने खडाष्टक नाटक बसवलं होतं. त्याचवेळी माझी शिरीषशी ओळख झाली. शिरीष मला बघितल्याबरोबर म्हणाला, कोण आहे रे ही पोरगी, चिकणी आहे. मी लग्न करणार हिच्याशी असं तो मित्राला म्हणाला. मित्राने त्याला भानगडीत पडू नकोस. ती खूप कडक आहे तुला झेपणार नाही असा सल्ला दिला होता.”
वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या “पण मला जेव्हा शिरीषने प्रपोज केलं तेव्हा मी घरी येऊन सांगितलं. तेव्हा माझी मोठी बहिण भारतीने मला लग्न बिग्न करणं सोप्प नाही विचार कर असा सल्ला दिला होता. पण जेव्हा पहिल्यांदा शिरीष माझ्या घरी आला होता तेव्हा माझे वडिल त्याला घेऊन स्टडी रुमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी चर्चा केली होती.”
हेही वाचा- “…त्या दिवशी माझा सगळा माज उतरला”; स्पृहा जोशीनं सांगितला अनुभव, म्हणाली…
दरम्यान काही दिवसांपूर्वी वंदना गुप्ते यांनी आपल्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी त्यांनी पती शिरीष गुप्ते यांच्याशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. मोजक्याच लोकांमध्ये आणि घरगुती पद्धतीने त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचा व्हिडीओही पोस्ट केला होता.