९०चं दशक गाजवणाऱ्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकर. चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. मराठीसह त्यांनी हिंदी भाषेतही काम केलं आहे. अशा लोकप्रिय अभिनेत्री अजूनही मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. सध्या त्या महेश कोठारे यांची निर्मिती असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत वर्षा यांनी साकारलेली माईची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच वर्षा उसगांवकर यांनी एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याविषयी एक खंत व्यक्त केली आहे.
अभिनेत्री वर्षा उसगांवकर या नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’च्या नो फिल्टर या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “मला असं वाटतं आज लक्ष्या असता तर तो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चमकला असता. मालिकांमध्ये त्याने खूप नाव कमावलं असतं. सॅटेलाइट त्यांच्या निधनानंतर फोफावला. लक्ष्याचं अवेळी, अकाली निधन झालं, असं मी म्हणेण. तो पन्नास वर्षांचा पण झाला नसेल. लक्ष्या खूप टॅलेंट होता.”
“मी लक्ष्याबरोबर ‘एक होता विदूषक’ नावाचा चित्रपट केला. त्याच्या आधी लक्ष्या कॉमेडी करत होता. पण लक्ष्याला ती खंत होतीच. माझा एक वेगळा पैलू लोकांना दिसला पाहिजे. डॉ. जब्बार पटेल यांनी त्याला ‘एक होता विदूषक’ ऑफर केला. पू.ल देशपांडे यांनी त्याचे संवाद लिहिले होते. एवढ्या मोठ्या एका सिद्धहस्त लेखाने संवाद लिहिले आहेत, अतिशय सुंदर असा तो चित्रपट होता. तो एवढा चालला नाही. एनएफडीसीने तो निर्मित केला होता. यावेळी मला लक्ष्याचा फोन आला, तुला हा चित्रपट करायचाच आहे. तुला नेहमी हिरोइन ओरिएंटेड रोल हवे असतात. पण हा हिरोईन ओरिएंटेड रोल नाहीये हिरो ऑरियंटेड आहे. विदूषकाची महत्त्वाची भूमिका आहे, ती मी करतोय. पण त्यामध्ये तू मला हवी आहेस. तिथे पैशाचा विचार करू नकोस. एनएफडीसी तुला जास्त पैसे देणार नाही. पण तो चित्रपट माझ्यासाठी कर. असं त्याने मला निक्षून सांगितलं. मग डॉक्टर माझ्याकडे आले कथा ऐकवायला. मला ती भूमिका खरंच आवडली. पैशांची बोलणी झाली, त्यांनी जी काही ऑफर आहे ती मला दिली. मी अजिबात यावेळी पैशांचा विचार केला नाही. मला ती भूमिका खूप आवडली.”
हेही वाचा – Video: साखरपुड्यात प्रथमेश परबचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
पुढे वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “‘एक होता विदूषक’मध्ये लक्ष्याचा एक वेगळा पैलू आहे. लक्ष्याला त्या चित्रपटात खूप रस होता. तो प्रत्येक फ्रेमच्या वेळी तिथे हजर असायचा. आपले सीन नसले तरी तो तिथे हजर असायचा. हे माझ्या हृदयाला भिडले. त्याने त्या चित्रपटात जे काम केलंय, त्यामध्ये तो मला एक वेगळा लक्ष्या दिसला. मलाच नाही तर प्रेक्षकांना हा दिसायला पाहिजे होता. मला असं वाटतं त्याने त्या चित्रपटात अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केला आहे. त्या वर्षीचा अवॉर्ड लक्ष्याला मिळाला नाही. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला ती खूप खंत वाटली की, या चित्रपटासाठी मला अवॉर्ड मिळायला हवा होता. खरंच मलाही असं वाटतं त्याला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. त्याला जर ते मिळालं असतं तर एक वेगळा पैलू त्याला पडला असता. त्याची जी इमेज तयार झाली होती त्यातून तो बाहेर आला असता. लक्ष्या रडवू पण शकतो, हे कळलं असतं. हे अवॉर्ड त्याला आयुष्यात मिळायला पाहिजे होतं, याची खंत मला ही वाटते.”