वर्षा उसगांवकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. ९० च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिले. आपल्या अभिनय व सौंदर्याच्या जोरावर त्यांनी अनेकांना वेड लावले होते. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्याबरोबर फोटो घेण्यासाठी चाहते नेहमी गर्दी करत असतात. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी चाहत्याचा आलेला विचित्र अनुभव शेअर केला आहे.
नुकतीच वर्षा उसगांवकर यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान या मुलाखतीत त्यांनी एका चाहत्याचा आलेला विचित्र अनुभवाबाबत सांगितला आहे. त्या म्हणाल्या, ” मी प्रिती परी तुझवरी नाटक करत होते. त्यावेळी माझा गंमत-जमंत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. एका गावातल्या शाळेत माझा प्रयोग होता. ती पडकी शाळा होती. तिचे बांधकाम सुरु होते. नाटक सुरु व्हायच्या अगोदर मी मेकअप करत होते. माझ्या मागे खिडकी होती. मी आरशात बघायला गेले तेव्हा मला खिडकीत बोटं दिसली. मी घाबरुन मागे बघितलं अन् अचानक एक मुलगा वर आला.”
त्या पुढे म्हणाल्या “मी घाबरुन किंचाळणार होते. तेवढ्यात तो म्हणाला पाया पडतो तुमच्या ओरडू नकात. मी तुमचा चाहता आहे. मी पाईपवरुन चढून वर आलो आहे. मला तुमचा अटोग्राफ हवा आहे. मी ओरडणार होते पण मला त्याची त्यावेळी खूप दया आली.”
वर्षा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास हमाल दे धमाल, अफलातून, सवत माझी लाडकी, गंमत जमंत, बायको चुकली स्टॅंडवर चित्रपटांमधील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. तर हिंदीत त्यांनी साथी, परदेसी, घरजमाई चित्रपटात काम केले. सध्या त्या सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेली माई या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.