अभिनेता स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, चित्रपट, वेब सीरिज, मालिका अशा विविध माध्यमांत स्वप्नीलने काम केले आहे. २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त स्वप्नीलने त्याच्या चिमुकल्यांसह सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस ‘२७ फेब्रुवारी’ हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित केला. प्रत्येक मराठी माणूस हा दिवस अतिशय गर्वाने साजरा करतो आणि मराठी बांधवांना शुभेच्छा देतो. या शुभदिनी स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकार मंडळींनी प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियावर त्याच्या दोन लहानग्या मुलांबरोबर शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, स्वप्नील मुलांना म्हणतो, “चला नावं सांगा आपली आपली” तेव्हा मुले त्यांची नावे राघव आणि मायरा, अशी सांगतात. त्यानंतर स्वप्नील आणि त्याची दोन्ही मुले शुभेच्छा देत एकत्र म्हणतात की, आमच्यातर्फे तुम्हा सर्वांना ‘मराठी भाषा दिना’च्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र!
स्वप्नीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “फारच गोड गोड शुभेच्छा आहेत.” तर दुसऱ्याने लिहिले, ” शुभेच्छा मराठी भाषेतून दिल्या. मुलांना मराठी शाळेत शिकायला पाठवता का?”
दरम्यान, स्वप्नीलच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, पुरस्कारविजेते चित्रपट निर्माते परेश मोकाशी यांच्या ‘नाच गं घुमा’ या आगामी चित्रपटातून स्वप्नील जोशी निर्माता म्हणून पदार्पण करीत आहे. तसेच १९ वर्षांनंतर येणाऱ्या ‘नवरा माझा नवसाचा-२’ या चित्रपटातदेखील स्वप्नील दिसणार आहे.