Boyz 4 Trailer : ‘बॉईज’ सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ व ‘बॉईज ३’ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर ‘बॉईज ४’ काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. नुकताच ‘बॉईज ४’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
नेहमीप्रमाणेच या चौथ्या भागातही कॉलेजवयीन मुलांची धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. याबरोबरच धमाल विनोदी संवाद आणि काही डबल मीनिंग डायलॉगही धमाल उडवून देत आहे. नेटकऱ्यांनी या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद दिला आहे. विनोद, धमाल, ड्रामा या नव्या भागात ठासून भरल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा : शाळेपासून कॉलेजपर्यंत लेक साराच्या शिक्षणासाठी सचिन तेंडुलकरने खर्च केलेत ‘इतके’ रुपये
याबरोबरच या सीरिजमधील मित्रांच्या या त्रिकूटात काही कारणामुळे मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत अन् नेमकं या तिघांचे गैरसमज दूर होतात की नाही, तिघांच्यात मैत्री पुन्हा होते की नाही ते आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चौथ्या भागात प्रेक्षकांचं ही लाडकं त्रिकुट लंडनमध्ये धमाल मस्ती करताना, नाचताना, गाताना पाहायला मिळणार आहे.
याबरोबरच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता गौरव मोर आणि त्याच्याबरोबरच अभिनय बेर्डेसुद्धा या चौथ्या भागात एका वेगळ्याच अवतारात पाहायला मिळणार आहे. खरं बघायला गेलं तर या दोघांच्या एंट्रीनेच प्रेक्षकांना फार उत्सुक केलं आहे. एकूणच ‘बॉईज’च्या इतर भागांप्रमाणेच हा ‘बॉईज ४’सुद्धा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार हे नक्की आहे.
चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.