Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक उमदा कलाकार गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.
रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
नुकतंच मराठी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना अभिजीत पानसे म्हणाले, “मला खरंच काही सुचत नाहीये, अगदी गलबलायला झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका फिल्म स्कूलच्या कामासाठी माझं नितीन दादाशी बोलणं सुरू होतं. खूप मोठा माणूस आज आपल्यातून गेला आहे. आपल्या महाराष्ट्राचं, देशाचं, जनतेचं हे नुकसान आहेच पण वैयक्तिकदृष्ट्या माझंही खूप मोठं नुकसान झालं आहे. नितीन दादाने असं का केलं मला माहिती नाही, मला आत्ता खरंच काही सुचत नाहीये.”
५८ व्या वर्षी नितीन देसाई यांनी केलेल्या आत्महत्येनेसगळ्याच कलाकारांना धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. एखाद्या चित्रपटाचं ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात नितीन देसाई यांचा सिंहाचा वाटा होता.